अमेय वाघसोबत थिरकली गौतमी पाटील; पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर जलवा

अभिनेता अमेय वाघसोबत गौतमी पाटील थिरकली असून तिचं हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. 'लाईक आणि सबस्क्राईब' या चित्रपटातील हे गाणं असून सोशल मीडियावर त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. यानिमित्ताने गौतमी पाटील पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

अमेय वाघसोबत थिरकली गौतमी पाटील; पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर जलवा
Amey Wagh and Gautami Patil
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 08, 2024 | 1:56 PM

काही दिवसांपूर्वी अभिनेता अमेय वाघसोबत पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या तरुणीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच ही अभिनेत्री कोण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अखेर या गोष्टीवरून पडदा उठला असून ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आहे. नुकतंच तिचं आणि अमेय वाघचं ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटातील पहिलं धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. क्षितिज पटवर्धनचे बोल असणाऱ्या ‘लिंबू फिरवलंय’ या भन्नाट गाण्याला अमितराज यांचं जबरदस्त संगीत लाभलं आहे. तर वैशाली सामंत आणि रवींद्र खोमणे यांनी आपल्या ठसकेबाज आवाजात हे गाणं गायलं आहे. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरेनं केलं आहे.

प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं हे गाणं ऐकायला जितकं जल्लोषमय आहे, तितकंच ते पाहायलाही कमाल आहे. ‘लिंबू फिरवलंय’ या गाण्याच्या निमित्ताने गौतमी पाटील पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर तिचा जलवा दाखवणार आहे. त्यामुळे आपल्या नखरेल अदाकारांनी घायाळ करणारी गौतमी पाटील या गाण्यातून संपूर्ण महाराष्ट्रावर लिंबू फिरवणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. या गाण्याबद्दल दिग्दर्शक अभिषेक मेरुकर म्हणाले, “एक धमाल गाणं असायलाच हवं, असा अट्टाहास असल्याने ‘लिंबू फिरवलंय’ हे एक दमदार गाणं ‘लाईक आणि सबस्क्राईब’मधून आम्ही घेऊन आलो आहोत. तुफान वाजणारं हे गाणं अतिशय कमाल चित्रित करण्यात आलं आहे. संगीत टीम, नृत्य दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टी उत्तम जुळून आल्या आहेत. त्यात गौतमी पाटीलचा ठसकेबाज परफॉर्मन्स या गाण्यात अधिकच रंगत आणतो. त्यामुळे पुढे हे गाणं प्रत्येक समारंभात नक्की वाजेल, याची खात्री वाटते.”

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरुकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून लेखन आणि दिग्दर्शनही अभिषेक मेरूकर यांनी केलं आहे. ‘लाईक आणि सबस्क्राईब’मध्ये अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 18ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.