
ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक आणि फार्मासिस्ट पद्मश्री फाटक यांची कन्या गिरीजा ओक ही तिच्या एका मुलाखतीच्या क्लिपमुळे रातोरात ‘नॅशनल क्रश’ बनली. मराठी कलाविश्वात जरी गिरीजा लोकप्रिय असली तरी सोशल मीडियामुळे तिची देशभरात चर्चा झाली. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गिरीजा तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आईवडिलांच्या घटस्फोटाचा तिच्या बालपणावर आणि मानसिक, भावनिक आरोग्यावर कसा परिणाम झाला, याविषयी तिने सांगितलं. आईवडिलांचं विभक्त होणं हा अचानक मिळालेला धक्का नव्हता, तर त्या धक्क्याने ती दररोज जगत होती, असं तिने म्हटलं.
“माझ्या आई आणि बाबांमध्ये एका नातं होतं, जे आम्हाला माहीत होतं. हळूहळू त्यांच्यातील दुरावा वाढू लागला आणि अखेर एकेदिवशी त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मी अचानक एकेदिवशी झोपेतून जागी झाले आणि मला मोठा धक्का बसला.. वगैरे अशी काही ही गोष्ट नव्हती. हा माझ्या आयुष्याचा एक भागच होता. ते दररोजचं जगणं होतं. त्याचा परिणाम तुमच्यावर कसा होतोय, हे तुम्हाला कळतसुद्धा नाही. माझ्यासोबत काय घडतंय हे मलाच समजत नव्हतं किंवा काहीतरी होतंय हेसुद्धा मला कळत नव्हतं”, असं गिरीजाने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
याविषयी ती पुढे म्हणाली, “मला पॅनिक अटॅक येऊ लागले. अचानक माझ्या हृदयाची धडधड वाढायची आणि माझ्या तळहातांना घाम यायचा. मला श्वास घेण्यास त्रास व्हायचा. मला आणखी गोंधळात टाकणारी बाब म्हणजे हे प्रसंग तणावात नसतानाही येत होते. मी कॉलेजला जाताना किंवा प्रयोगशाळेत अभ्यास करतानाही असं घडायचं. पण माझं शरीर खूप दिवसांपासून साचलेल्या ताणाला प्रतिसाद देत होतं. माझ्यात वैद्यकीयदृष्ट्या काहीतरी गडबड आहे, असं समजून मी आधी डॉक्टरांची मदत घेतली. तेव्हा त्यांनी मला थेरपी सुचवली. त्यांनी मला टॉक थेरपीसाठी मानसशास्त्रज्ञांकडे नेलं आणि त्यानंतर मला सौम्य एसओएस औषधंदेखील देण्यात आली.”
“मी या भाराने जगते की मी एका अयशस्वी किंवा मोडलेल्या लग्नाचं प्रॉडक्ट आहे. सर्वकाही बरोबर करण्याचा दबाव इतका होता की त्यामुळे रिलेशनशिप्सकडे बघण्याच्या माझ्या दृष्टीकोनावर परिणाम झाला. जर मी हा भार स्वत:वर घेतला नसता, तर मी माझ्या मागच्या काही रिलेशनशिप्समध्ये स्वत:साठी उभी राहिली असती”, असं गिरीजाने कबूल केलं. यावेळी जोडीदार म्हणून सुहृद गोडबोलेसारखी व्यक्ती भेटल्याचं समाधानदेखील तिने व्यक्त केलं.
“सुदैवाने मला अशी व्यक्ती भेटली जी इतर सर्व गोष्टींपेक्षा खरोखरच माझा खूप चांगला मित्र बनला. मी सुहृदशी कोणत्याही गोष्टीबद्दल बोलू शकते. आम्हाला एकमेकांच्या संवेदनशील बाबींची माहिती आहे. भूतकाळात माझा खूप मोठा हृदयभंग (ब्रेकअप) झाला होता. सुहृद माझ्या आयुष्यात येण्यापूर्व सर्वकाही वाईट होतं. त्यामुळे तो मला एखाद्या बामसारखा वाटला”, असं ती पुढे म्हणाली.