‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने गर्भपातासाठी घेतलेले 5 कोटी रुपये? आरोपांवर अभिनेत्याने सोडलं मौन
बिग बॉस 20 मध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्रीचं खासगी आयुष्य सध्या चर्चेत आलं आहे. तिने गर्भपातासाठी पाच कोटी रुपयांची सेटलमेंट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर आता प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन गुरप्रीत घुग्गीने प्रतिक्रिया दिली आहे.

पंजाबी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन गुरप्रीत घुग्गी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पसरलेल्या चर्चांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्री लव गिलसोबत कथित अफेअर, प्रेग्नन्सी आणि पाच कोटी रुपयांच्या सेटलमेंटच्या दाव्यांमुळे काही महिन्यांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. आता हा जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या आरोपांवर गुरप्रीत घुग्गीने व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्याने थेट इशाराही दिला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
गुरप्रीत घुग्गी आणि अभिनेत्री लव गिल यांनी पंजाबी चित्रपट ‘फर्लो’मध्ये एकत्र काम केलं होतं. यानंतर दोघांच्या कथित नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. कॅनडामधील एका यूट्यूबरने या दोघांबद्दल काही गंभीर दावे केले होते. गुरप्रीत आणि लव यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा, लव गर्भवती झाल्याचा आणि हे प्रकरण दडपण्यासाठी पाच कोटी रुपयांचं सेटलमेंट झाल्याचा दावा करण्यात आला होता. लव गिल सध्या ‘बिग बॉस 20’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.
गुरप्रीतचा व्हिडीओ-
गुरप्रीत घुग्गीने हे सर्व आरोप फेटाळून लावत ते पूर्णपणे खोटे आणि बनावट असल्याचं स्पष्ट केलं होतं. लव गिलनेही या अफवांचं खंडन केलं होतं. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गुरप्रीतने सांगितलं की, त्याने आपलं संपूर्ण आयुष्य मेहनतीने घडवलं आहे. जवळपास 35 ते 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने प्रामाणिकपणे काम केलं आहे. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या आरोपांना आपण घाबरणार नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
या प्रकरणामुळे केवळ आपल्यालाच नव्हे, तर संबंधित मुलीलाही मानसिक त्रास सहन करावा लागल्याचं त्याने सांगितलं. या प्रकरणी सायबर क्राइम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहितीही त्याने दिली. तसंच गरज पडल्यास न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, ‘बिग बॉस 20’मध्ये सहभागी झालेली लव गिल अलीकडे स्काउट ओपीसोबतच्या वादामुळे चर्चेत आली होती. स्काउटची गर्लफ्रेंड काशवी हिरानंदानी हिने शोमध्ये केलेल्या वक्तव्यांनंतर लव भावूक झाली होती. यावेळी तिने आपण एका कठीण काळातून नुकतीच बाहेर पडल्याचं सांगितलं. तिच्या या वक्तव्यानंतर गुरप्रीत घुग्गी याच्याशी संबंधित जुन्या वादाची पुन्हा चर्चा सुरू झाली.