माता पार्वतीच्या त्या हट्टाने देवही झाले होते हैराण; ब्लॉकबस्टर ‘हनुमान अंश’मधील भजन तुफान व्हायरल; लाखो व्ह्यूज
Hanuman Ansh: चित्रपटाच्या यशानंतर आता त्यातील ‘पार्वती’ भजनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. त्यामुळे ‘हनुमान अंश’चा बॉक्स ऑफिसवरील चमत्कार आणि त्यातील भक्तिगीतांची लोकप्रियता सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

Hanuman Ansh: अत्यंत छोट्या बजेटमध्ये तयार झालेल्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित यश मिळवत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील गाणी आणि भजनांनाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. आता या चित्रपटातील माता पार्वती आणि भगवान शंकर यांच्यावर आधारित बुंदेली भजन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. यूट्यूबवर या गाण्याला 50 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
भजनात नेमकं काय?
‘हनुमान अंश’मध्ये ‘पार्वती’ नावाचं एक बुंदेली गाणं आहे. हे पारंपरिक अर्थाने केवळ गाणं नसून भक्तिगीताच्या स्वरूपात सादर करण्यात आलं आहे. या भजनामध्ये माता पार्वती यांनी भगवान शंकर यांनाच पती म्हणून स्वीकारण्याचा घेतलेला निर्धार आणि त्यासाठी केलेली तपश्चर्या यांचा संदर्भ देण्यात आला आहे. कथेनुसार, माता पार्वती यांनी भगवान शंकर यांच्याशी विवाह करण्याचा निश्चय केला आणि त्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी सप्तऋषी त्यांच्याकडे गेले. त्यांनी पार्वतीला हा हट्ट सोडण्याचा सल्ला देत अनेक कारणं सांगितली. याच प्रसंगातील संवाद आणि पार्वतीच्या निर्धाराचं चित्रण या भजनातून करण्यात आलं आहे.
पहा व्हिडीओ-
या भजनाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे साधू तिवारी यांनी हे गीत लिहिलं असून त्यांनीच ते गायलं आणि संगीतबद्ध केलं आहे. बुंदेली भाषेतील शब्द, भक्तीमय संगीत आणि पौराणिक प्रसंग यांचा सुंदर मेळ या गाण्यात पाहायला मिळतो. चित्रपटातील संगीताची हीच खासियत आधीपासून चर्चेत आहे. ‘हनुमान अंश’मधील गाणी ब्रज, अवधी आणि बुंदेली यांसारख्या प्रादेशिक बोलींमध्ये तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या भक्तिमय वातावरणाला अधिक प्रभावीपणा मिळाल्याचं दिसतं.
‘हनुमान अंश’च्या बॉक्स ऑफिस कामगिरीनेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं बजेट सुमारे 2 कोटी रुपये आहे. सुरुवातीला संथ सुरुवात झाल्यानंतर चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यापासून जोरदार कमबॅक केला. आता चित्रपटाने चौथ्या आठवड्यात प्रवेश केला असून, 1 सप्टेंबरपर्यंत त्याची भारतातील नेट कमाई 45.28 कोटी रुपये झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे केवळ दोन कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटासाठी हा आकडा अत्यंत मोठा मानला जात आहे.