50 ATKT, गावभर लागले नापासाचे होर्डिंग्ज; हर्षद अतकरीने सांगितला भन्नाट किस्सा

अभिनेता हर्षद अतकरी लवकरच 'येतेच आता मी नांदायला' या मालिकेतून अभिजीत थोरात या नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना त्याने 50 ATKT आणि गावभर लागलेल्या स्वतःच्या नापासाच्या होर्डिंग्जचा भन्नाट किस्सा सांगितला.

50 ATKT, गावभर लागले नापासाचे होर्डिंग्ज; हर्षद अतकरीने सांगितला भन्नाट किस्सा
हर्षद अतकरी
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2026 | 10:23 AM

प्रत्येक मालिकेचं यश हे तिच्या कथेसोबतच त्यातील कलाकारांच्या उत्तम अभिनयावरही अवलंबून असतं. कलाकारांची योग्य निवड आणि त्यांच्यातील उत्तम समन्वय यामुळे मालिकेतील प्रत्येक प्रसंग अधिक खुलतो. अशाच एका उत्तम कलाकारांच्या संचासोबत अभिनेता हर्षद अतकरी ‘अभिजीत थोरात’ या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेतील त्याची भूमिका आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी असून, या निमित्ताने त्याने मालिकेतील कलाकार, त्यांचा अनुभव आणि आपल्या भूमिकेबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.

याबद्दल बोलताना हर्षद म्हणाला,“‘येतेच आता मी नांदायला’ मालिकेसाठी माझं कास्टिंग सगळ्यात शेवटी झालं. त्याआधीच बाकीचे सगळे कलाकार निवडले गेले होते. पण जेव्हा मी संपूर्ण टीमला भेटलो, तेव्हा जाणवलं की इतकी तगडी कास्टिंग कोणत्याही शोला मिळणं हे त्या शोचं नशीबच आहे. सगळ्या कलाकारांची खूप छान भट्टी जमली आहे आणि मला खात्री आहे की सगळ्यांची कामं प्रेक्षकांना नक्की आवडतील.पूजाला मी आधीपासून ओळखत असलो, तरी तिच्यासोबत पहिल्यांदाच काम करतोय. ती खूप उत्तम आणि गुणी अभिनेत्री आहे. अशा कलाकारांसोबत काम करायला नेहमीच मजा येते. त्यात आमचे सीन्ससुद्धा खूप धमाल आणणारे आहेत आणि ते प्रेक्षकांनाही नक्की आवडतील, याची मला खात्री आहे. उषा मॅम यांच्याबद्दल सांगायचं तर त्या एक दिग्गज कलाकार आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि प्रत्येक दिवशी मी काहीतरी नवीन शिकत आहे.”

Loading...

“एक मजेशीर किस्सा सांगायचा तर, या शोमध्ये माझं पात्र खूप वेळा नापास झालेलं आहे. त्याला तब्बल 50 एटीकेटी लागल्या आहेत. एका सीनमध्ये आपल्या आईला सतत वाईट बोलणाऱ्या आजीला धडा शिकवण्यासाठी तो संपूर्ण गावात स्वतःचे होर्डिंग्ज लावतो. पण ज्या गावात आम्ही शूटिंग करत होतो, तिथे शूटिंग संपल्यानंतरही हे होर्डिंग्ज कोणी काढलेच नाहीत. जवळपास दोन दिवस माझे नापास झालेले होर्डिंग्ज , माझ्या मोठ्या कटआऊटसह तसेच उभे होते,” असा भन्नाट किस्सा त्याने सांगितला.

या मालिकेविषयी हर्षद पुढे म्हणाला, “प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे की, आजवर मी असं पात्र कधीच साकारलेलं नाही. एका वेगळ्याच रूपात मी प्रेक्षकांसमोर येणार आहे. या शोमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सगळ्याच गोष्टी आहेत. यात कौटुंबिक नाट्य तर आहेच, पण त्यासोबत विनोद आणि धमालसुद्धा आहे. उत्तम कलाकारांची फौज , जी प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल.”

हर्षदची आजवर न पाहिलेली भूमिका आणि संपूर्ण कलाकारांची धमाल केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘येतेच आता मी नांदायला’ ही मालिका येत्या 30 नोव्हेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us