
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचं गेल्या महिन्यात, 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं.ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर 16 दिवसांनी धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी (Hema Malini) यांनी दिल्लीत त्यांच्यासाठी प्रेअर मीट ठेवली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मुली ईशा आणि आहना देओल देखील उपस्थित होत्या. या प्रेअर मीटमध्ये हेमा मालिनी या उपस्थितांसमोर धर्मेंद्र यांच्याबद्दल भरभरून बोलल्या. मात्र बोलता बोलता त्या धर्मेंद्र यांच्या आठवणीने भावूक झाल्या. त्यांना शब्दच फुटत नव्हते, दिवंगत पतीच्या आठवणीने त्यांचा ऊर भरून आला, डोळ्यांत अश्रूंची दाटी झाली होती. हे दृश्य पाहून उपस्थित लोकांपैकी अनेक जण अश्रू रोखू शकले नाहीत.
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या प्रेअर मीटमध्ये हेमा मालिनी यांनी त्यांच्या व धर्मेद्र यांच्या लव्हस्टोरी बद्दल तसेच त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल काही गोष्टी सांगितल्या. त्या म्हणाल्या – ‘ धरमजी यांच्यासोबत मी अनेक चित्रपटांत प्रेमाचा अभिनय केला. पुढे तेच माझे जीवनसाथी बनले. आमचं प्रेम खरं होतं, त्यामुळे आमच्यात कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची ताकद होती आणि आम्ही दोघांनी लग्न केलं. ते माझ्यासाठी अतिशय समर्पित जीवनसाथी बनले. ते माझं माझा प्रेरणास्थान आणि ताकदीचा आधारस्तंभ होते, प्रत्येक पावलावर ते माझ्या पाठीशी उभा राहिले. मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाशी ते सहमत होते,’ अस त्यांनी नमूद केलं.
लहान मुलांना पाहून धरमजी…
धर्मेंद्र यांच्याबद्दल हेमामालिनी पुढे म्हणाल्या – ‘ आमच्या दोन्ही मुली, ईशा आणि अहाना, यांच्यासाठी ते प्रेमळ वडील होते, ते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असत आणि योग्य वेळी त्यांनी त्यांचं लग्नही करून दिलं. आमच्या नातवंडांसाठी ते एक प्रेमळ आजोबा होते आणि ती मुलंही त्यांच्या आजोबांबद्दल वेडी होती. लहान मुलांना पाहून धरमजी खूप आनंदी व्हायचे आणि मला म्हणायचे, ‘हे बघ, ही आपली खूप सुंदर फुलांची बाग आहे, ती नेहमी प्रेमाने जपून ठेव.’ अशी आठवण त्यांनी सांगितली.
धरम जी यांच्यासाठी एक शोक सभा ठेवावी लागेल असं..
यावेळी हेमा मालिनी प्रचंड इमोशनल झाल्या होत्या आणि धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलता बोलता त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. त्या म्हणाल्या. ‘ मला कधी वाटलं नव्हतं की आयुष्यात असा एखादा क्षण येईल की, मलाही एक शोकसभा आयोजित करावी लागेल, ती देखील माझ्या धरमजी यांच्यासाठी… संपूर्ण जग त्यांच्या निधनामुळे शोकाकुल आहे. पण माझ्यासाठी हा असा एक धक्का आहे, ज्यातून मी कधीच बाहेर पडू शकणार नाही’ असं बोलताना हेमा मालिनी यांना रडू कोसळलं.