Nana Patekar: नाना पाटेकरांचा शेवटचा फोन, पण…; हेमा मालिनी यांनी बोलून दाखवली मोठी खंत
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांच्या अभिनयातील सहजता, संवादफेक आणि प्रत्येक भूमिकेला दिलेली वेगळी छाप यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनयाने अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकार जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनीही नाना पाटेकर यांच्या आठवणी सांगताना एक भावनिक खुलासा केला आहे. नाना यांनी निधनाच्या साधारण आठवडाभर आधी त्यांना फोन केला होता. मात्र, प्रवासात असल्यामुळे त्यांचा हा फोन त्या उचलू शकल्या नाहीत. आता नाना यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसल्याचं हेमा मालिनी यांनी सांगितलं.
‘मी प्रवासात होते, त्यामुळे फोन उचलू शकले नाही’
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्यासोबतच्या शेवटच्या संवादाची आठवण सांगितली. नाना यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना फोन केला होता. साधारण आठवडाभर आधीही त्यांचा फोन आला होता, असं त्यांनी नमूद केलं. मात्र, त्या प्रवासात असल्यामुळे फोन उचलू शकल्या नाहीत. नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर आपल्याला मोठा धक्का बसल्याचं हेमा मालिनी म्हणाल्या. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीने एक महान अभिनेता गमावला आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. नाना हे केवळ उत्कृष्ट कलाकार नव्हते, तर अभिनयाची एक स्वतंत्र संस्था होते, अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. नाना यांनी आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं, असं त्यांनी म्हटलं. हिंदी आणि मराठी चित्रपटांमधील नाना यांच्या विविधांगी भूमिका कायम लक्षात राहतील. त्यांचे चित्रपट पाहायला आपल्याला आवडत आणि प्रत्येक भूमिकेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता, असंही हेमा मालिनी यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे, नाना पाटेकर यांनी एकदा हेमा मालिनी या त्यांच्या आवडत्या अभिनेत्री असल्याचं म्हटलं होतं. या आठवणीचाही उल्लेख करत त्यांनी नाना यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली. नाना पाटेकर यांची ओळख केवळ एक प्रभावी अभिनेता म्हणून नव्हती. त्यांनी सामाजिक कार्यातूनही अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला. विशेषतः शेतकरी आणि वंचित घटकांच्या मदतीसाठी त्यांनी केलेलं काम महत्त्वाचं मानलं जातं.