
अभिनेता हृतिक रोशनच्या घरात सध्या जल्लोषाचं वातावरण आहे, कारण त्याचा चुलत भाऊ ईशान रोशन नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. या लग्नसोहळ्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये हृतिक आणि त्याचे वडील राकेश रोशन वरातीत नाचताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये हृतिकने त्याच्या दोन्ही मुलांसोबत ठेका धरल्याचं पहायला मिळतंय. हृतिकला डान्स करताना चाहत्यांनी अनेकदा पाहिलंय आणि त्याच्या डान्सची प्रचंड क्रेझसुद्धा आहे. परंतु मुलांसोबत नाचताना त्याला पहिल्यांदाच पाहिलं गेलंय. लग्नातील एका कार्यक्रमात हृतिक त्याची दोन्ही मुलं रेहान आणि हृदानसोबत डान्स करताना दिसतोय. या व्हिडीओने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हृतिकसोबत रेहान आणि हृदानसुद्धा जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. तर डान्स फ्लोअरवर त्याची भाची सुरानिका सोनी आणि चुलत बहीण पश्मिना रोशनसुद्धा सहभागी झाल्या आहेत. या व्हिडीओमध्ये हृतिक ‘इश्क तेरा तडपावे’ या गाण्यावर नाचताना दिसतोय. हृतिकला मुलांसोबत नाचताना पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. हृतिकच्या मुलांच्या डान्सचंही नेटकरी कौतुक करत आहेत. ‘हृतिकच्या मुलांना सर्व चांगल्या गोष्टी वारसा म्हणून मिळाल्या आहेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘रोशन ब्रदर्स फक्त डान्स करत नाहीत, ते स्टेजवर धमाका करतात’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
The Roshan boys rock the dance floor at Eshaan’s wedding. #HrithikRoshan #HrehaanRoshan #HridaanRoshan pic.twitter.com/xMwcG8c2jD
— HrithikRules.com (@HrithikRules) December 23, 2025
दुसरीकडे या लग्नसोहळ्याच्या गडबडीत हृतिक रोशनची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सबा आझाद अचानक आजारी पडली आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये रुग्णालयाच्या बेडवरील स्वत:चा फोटो पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती दिली. या फोटोमध्ये तिच्या हाताला सलाइन लावल्याचं दिसतंय. ‘बाहेरचं काहीच खाऊ नका. या नॉटी बगमुळे मी माझ्या भावाच्या लग्नाला गैरहजर राहिली असती’, असं तिने फोटोवर लिहिलं आहे.
ईशान रोशनच्या लग्नाला हृतिकची पूर्व पत्नी सुझान खानसुद्धा उपस्थित होती. सुझान तिचा बॉयफ्रेंड अली गोणीसोबत या लग्नाला पोहोचली होती. घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुझान यांच्यात मैत्रीपूर्ण नातं कायम आहे. इतकंच नव्हे तर सबा आणि सुझान यांच्यातही चांगली मैत्री असल्याचं पहायला मिळतं.