एक-दोन नाही, आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करतोय हृतिक रोशन; चकीत करणारे खुलासे

अभिनेता हृतिक रोशन वरकरणी अत्यंत फिट दिसत असला तरी लहानपणापासून त्याला आरोग्याच्या विविध समस्या आहेत. नुकत्याच एका पोस्टद्वारे हृतिक याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. इन्स्टाग्रामवर त्याने यासंदर्भात भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

एक-दोन नाही, आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करतोय हृतिक रोशन; चकीत करणारे खुलासे
Hrithik Roshan
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 27, 2026 | 10:24 AM

बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशन नुकताच अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा पती गोल्डी बहलच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाला होता. यावेळी हृतिक कुबड्याच्या सहाय्याने चालताना दिसला आणि त्याला अशा अवस्थेत पाहून चाहत्यांनाही धक्का बसला. सोशल मीडियावर हृतिकचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्या आरोग्याबाबत प्रश्न विचारले. आता खुद्द हृतिकनेच यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या आरोग्याबद्दल चकीत करणारे खुलासे केले आहेत. या पोस्टमध्ये हृतिकने सांगितलं की तो आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरं जात आहे. काही समस्या तर त्याला जन्मापासूनच आहेत.

हृतिकने 25 जानेवारी रोजी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत लिहिलं, ‘काल अचानक माझ्या डाव्या गुडघ्याने दोन दिवसांचा ब्रेक घेतला, ज्यामुळे मला पूर्ण दिवस त्रास जाणवला. कालपासून पूर्ण दिवस मी चिडचिडच करत होतो. हे माझं रोजचं आयुष्य आहे. आपण सर्वजण एका अशा शरीरात राहतो, ज्याच्या काम करण्याच्या यंत्रणेला आपण कधीच पूर्णपणे समजू शकणार नाही. परंतु माझं शरीर हे अत्यंत अनोखं आणि रंजक आहे. शरीराच्या प्रत्येक भागाचं एक ऑन आणि ऑफ बटण असतं. माझा डावा पाय या फीचरचा वापर जन्मापासूनच करतोय. माझा डावा खांदा आणि उजवा घोटादेखील या श्रेणीत येतो. थेट ऑफ होतात. या छोट्याशा सुविधेनं मला असे अनुभव दिले आहेत, जे बहुतांश लोकांना मिळत नाहीत. मी अत्यंत गर्वाने असा फिरत असतो, जणू माझ्या मेंदूत असे काही न्यूरॉन्स आहेत, जे अचानक आलेल्या असहायतेत विशेषतज्ज्ञ असतील. माझ्याकडे एक अद्वितीय सायनॅप्स सिस्टिम आहे, जे क्षणार्धात निराशेच्या गडद खड्ड्यात सरकण्यात मास्टर आहे… विविध प्रकारच्या अथांग अंधारात.’

या पोस्टमध्ये हृतिकने पुढे लिहिलं, ‘या सर्व समस्यांमुळे माझ्या मनात काही असे मार्ग विकसित झाले आहेत, जे कदाचित इतरांपेक्षा वेगळे आहेत. त्यापैकी सर्वांत प्रमुख म्हणजे माझी विनोदबुद्धी. उदाहरणार्थ.. काही दिवसांपासून माझी जीभ ‘रात्रीचं जेवण’ हा शब्दही उच्चारण्यास नकार देतेय. कल्पना करा.. मी एका चित्रपटाच्या सेटवर आहे. कोर्टरुममध्ये एक गंभीर दृश्य सुरू आहे. तुम्ही घरी जेवायला येणार का, असा डायलॉग आहे. पण माझ्या जीभेनं ‘रात्रीचं जेवण’ या शब्दालाच ऑफ केलंय. त्यामुळे अत्यंत हुशारीने आणि पूर्ण विश्वासाने मी समोरच्या व्यक्तीला सतत दुपारच्या जेवणासाठी आमंत्रित करतो. कारण सुदैवाने दुपारचं जेवण सध्या तरी ऑन आहे. हे सर्व पाहून माझे दिग्दर्शिक संभ्रमात पडतात. अखेर ते या विचित्र परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न सोडून देतात आणि कदाचित ती काही विचित्र प्रकारची नशिबाची गोष्ट आहे असं गृहीत धरून पुढे जातात (त्यासाठी देवाचे आभार).’

‘या कॉमेडीची मजा तोपर्यंत येत नाही, जोपर्यंत तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहत नाही. आधी चुकीचा शब्द उच्चारल्याने अचानक चकीत होणं, मग पुन्हा तिच चूक झाल्याने हात वर झटकणं, टेक्स्टदरम्यान खोल विचारांमध्ये बुडून जाणं.. जणू काही मोठ्या समस्येचा तपासच सुरू आहे (जॉय स्टाइल), मग नाक झटकणं (सलमान स्टाइल) आणि अखेर स्वत:हून बनवलेल्या या खासगी कटावर जोरात, न थांबणारं हसू.. ज्याला मी आजूबाजूच्या थोड्याशा त्रस्त लोकांना ‘लाज लपवण्याच्या प्रयत्ना’सारखं दाखवतो. दुसरीकडे अत्यंत मेहनती सहाय्यक पुन्हा-पुन्हा धावत माझ्या कानात योग्य शब्द उच्चारत राहतात. इतकं प्रामाणिक समर्पण आणि प्रेम की माझं हृदय प्रेमाने भरून जातं. मला आश्चर्य वाटतं की मी त्याला या गुप्त योजनेत माझा विश्वासू साथीदार बनवावं का? पण मी फक्त मान हलवून सहमती देतो. मग पूर्ण आत्मविश्वासाने मी कॅमेराकडे वळतो आणि म्हणतो ‘दुपारचं जेवण’. जो शेवटचा टेक बनतो आणि त्यानंतर शांतता पसरते. माझी जखम भरली जाते, असं माझ्या मेंदूचं मत आहे, जे अमूल्य आहे’, असं तो या पोस्टच्या अखेरीस लिहितो.