
मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग होत असतात. पण आता गोंधळ या चित्रपटाने थेट भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा आणि भव्य विक्रम स्थापित केला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून प्रशंसा मिळवत आहे. उत्कृष्ट कथानक आणि दमदार अभिनयाच्या जोरावर चर्चेत असलेल्या या चित्रपटात तब्बल २५ मिनिटांचा अखंड वन-टेक (One-Take) सीन चित्रित करण्यात आला आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील हा पहिलाच इतक्या मोठ्या कालावधीचा वन-टेक प्रयोग ठरला आहे.
गोंधळ चित्रपटाचा हा २५ मिनिटांचा हा भव्य सीन परिपूर्ण करण्यासाठी संपूर्ण टीमने सात दिवस अथक मेहनत घेतली. दिग्दर्शक संतोष डावखर यांनी याबद्दलची माहिती दिली. प्रत्येक वायर, प्रत्येक फोकस आणि प्रत्येक कलर तापमानावर आमची कसोटी लागली होती. दररोज ३०० हून अधिक जुनिअर्स, पाऊण किलोमीटरपेक्षा जास्त लाइटिंग सेटअप, पाच जनरेटर आणि पेट्रोलचे तीन टँकर यासाठी लागले.” असे संतोष डावखर म्हणाले. हा सीन एकाच टेकमध्ये सुरळीत पार पडणे म्हणजे एक जादूच होती, असेही ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वन-टेक शैलीला विशेष महत्त्व आहे. २०१४ मधील ‘बर्डमॅन’ आणि २०१९ मधील ‘१९१७’ यांसारख्या ऑस्कर विजेत्या चित्रपटांनी याच शैलीचा प्रभावीपणे वापर केला आहे. ‘गोंधळ’चा हा प्रयोग त्याच दर्जाच्या धाडसाच्या पावलावर पाऊल टाकणारा आहे. ज्यामुळे मराठी चित्रपटाने तांत्रिक प्रयोगांची नवी मर्यादा गाठली आहे.
गोंधळ हा चित्रपट महाराष्ट्राची परंपरा, मानवी भावनांमधील गुंतागुंत, नात्यांमधील ताणतणाव आणि परिस्थितीच्या रोलर-कोस्टरवर आधारित आहे. नाट्य आणि थरार यांचा अनोखा संगम असलेली ही कथा प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. याची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले आहेत. त्यांनीच चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत.
यात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे नामवंत कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. गोंधळने केलेला हा प्रयोग केवळ मराठी चित्रपटसृष्टीसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानास्पद क्षण आहे.