
मुंबई : भर कार्यक्रमात तोसुद्धा इंडियन आयडॉलसारखा (Indian Idol) कार्यक्रम, ज्याला कोट्यवधी लोक पाहत असतात… त्या मंचावर मला कळलं की माझे खरे पालक वेगळे आहेत. मी दत्तक घेतलेला मुलगा आहे. त्या वेळी प्रचंड धक्का बसला. नेमकं काय रिअॅक्ट करावं कळत नव्हतं. मी आतून तुटलो होतो. खूप खूप रडलो. त्यामुळे इतर स्पर्धक मित्रांनी समजावून सांगितलं. मी खूप नशीबवान आहे. माझे आई-बाबा देवदूत बनून माझ्या आयुष्यात आले, त्यांचा मी आयुष्यभर ऋणी असेन… इंडियन आयडॉल सिझन 13 चा अंतिम विजेता ऋषी सिंह दुसऱ्याच दिवशी अयोध्येत पोहोचला. यावेळी त्याने ऑडिशनपासून ते इंडियन आयडॉलची ट्रॉफी जिंकेपर्यंत प्रवासातील अनेक महत्त्वाचे किस्से सांगितले. अयोध्येच्या सुपुत्राने ही ट्रॉफी जिंकल्याबद्दल नागरिकांनी ऋषी सिंहला (Rishi Singh) अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील ऋषी आणि त्याच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.
इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंहने त्याच्या प्रवासाबदद्ल सांगितलं. लहानपणापासून मला गाणं आवडतं. माझं कौशल्य लोकांनी ओळखावं, हाच या कार्यक्रमात येण्यामागचा उद्देश होता.. इंडियन आयडॉलच्या सीझन ११ मध्ये मी प्रयत्न केला होता. पण ऑडिशन राउंडमध्येच रिजेक्ट झालो होतो. पहिल्याच प्रयत्नात रिजेक्ट झालो होतो तेव्हा, खूप धक्का बसला होता. पण मी एक चॅलेंज म्हणून हे स्वीकारलं. माझ्यात जिद्द होती. पुन्हा प्रयत्न केले, अशी भावना ऋषी सिंहने बोलून दाखवली.
VIDEO | “I was completely blank when my name was announced as the winner,” says Ayodhya’s Rishi Singh, who won the ‘Indian Idol Season 13’ title on Sunday. pic.twitter.com/EhmHvFQKy9
— Press Trust of India (@PTI_News) April 4, 2023
इंडियन आयडॉलचं स्टेज म्हणजे असंख्य अनुभवांचा खजिनाच आहे, अशी भावना ऋषी सिंहने व्यक्त केली. या कार्यक्रमात अनेक चांगले मेंटॉर्स मिळाले. पण स्टेज एक अशी जागा आहे, जिथे एकाही चुकीला माफी नसते. कितीही त्रास होत असला तरी परफॉर्मन्स चांगलाच करावा लागतो. हे सांगताना ऋषीने एक किस्सा सांगितला. एका गाण्यावेळी माझा आवाज बसला होता. गाणं गायला खूप त्रास होत होता. स्टेजवर जाण्यापूर्वी असंख्य विचार येत होते… पण त्या वेळी हार मानली असती तर ट्रॉफी जिंकता आली नसती. मी पूर्ण हिंमत एकवटून गाणं गायलं…
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक अभिनेते आणि कलाकार भेटले. पण मी रणवीर कपूरची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. तो आला आणि माझी अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. या कार्यक्रमादरम्यान, मला इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचा पर्सनल मेसेज आला. त्या दिवशीही मला खूप धक्का बसला. या शोमुळे माझे अनेक स्वप्न पू्र्ण झाले, अशी प्रतिक्रिया ऋषी सिंहने दिली.
इंडियन आयडॉलची ट्रॉफी जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांचं काय करणार, हे विचारल्यावर ऋषी सिंह म्हणाला, मी एक मध्यम वर्गीय कुटुंबातला आहे. अशा प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न असतं, एक चांगली कार असावी. बाबा म्हणत असत, तू तुझ्या पैशांनी कार खरेदी केली तर आम्हाला अभिमान वाटेल. आज मी माझ्या मेहनतीने ती मिळवली. आई-बाबांचा आनंद गगनात मावेना, अशी स्थिती आहे. मला मिळालेल्या 25 लाख रुपयांच्या रकमेतून मी एक म्युझिक स्टुडिओ स्थापन करेल. मुंबई हीच आता माझी कर्मभूमी बनली आहे. त्यामुळे पुढचं करियर तिथेच घडवेन, अशा भावना ऋषी सिंहने बोलून दाखवल्या.