Trisha Krishnan : विजयसाठी वाईट वाटतंय… त्रिशा कृष्णनच्या आईच्या विधानाने वेधलं लक्ष

थलपती विजय यांच्या 'जन नायकन' बॉक्स ऑफिसवर धमाकेदार यश मिळवत आहे, पहिल्याच दिवशी 41 कोटींची कमाई केली. मात्र, हा चित्रपट विजयचा शेवटचा असल्याच्या चर्चेने चाहत्यांमध्ये भावनिक वातावरण आहे. त्रिशा कृष्णनच्या आईनेही याबाबत प्रतिक्रिया दिली.

Trisha Krishnan : विजयसाठी वाईट वाटतंय... त्रिशा कृष्णनच्या आईच्या विधानाने वेधलं लक्ष
त्रिशा कृष्णनच्या आईच्या वक्व्याने वेधलं लक्ष
| Updated on: Jul 24, 2026 | 10:31 AM

अभिनेते थलपती विजय, बॉबी देओल आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जन नायकन’ गुरुवारी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करत भारतात तब्बल 41 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला तमिळ प्रेक्षकांकडून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून हिंदी आवृत्तीने पहिल्या दिवशी 1.25 कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे थलपति विजय यांचे चाहतेही खूप खुश आहेत. मात्र थलापती विजय यांच्या या चित्रपटाची चर्चा केवळ बॉक्स ऑफिसपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर त्यांच्या चाहत्यांसाठी हा भावनिक क्षणही ठरताना दिसत आहे. विजय यांची मैत्रीण आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिनेही पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये जाऊन ‘जन नायकन’ चित्रपट पाहिला. यावेळी त्रिशासोबत तिची आई, उमा कृष्णन यांनीही चेन्नईतील एका थिएटरमध्ये चित्रपटाचा आनंद घेतला.

विजय यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर उमा कृष्णन भावूक

‘जन नायकन’ पाहिल्यानंतर उमा कृष्णन यांनी चित्रपटाचे कौतुक केले. मात्र, थलापती विजय यांचा हा शेवटचा चित्रपट असल्याच्या चर्चेवर त्या भावूक झाल्या. त्यांनी त्याबद्दल प्रतिक्रियाही दिली. “आम्ही खूप चांगला वेळ घालवला. आम्हाला चित्रपट खरोखर खूप आवडला. पण हा त्यांचा (विजय थलपती) शेवटचा चित्रपट आहे याचं वाईट वाटत आहे. आम्ही त्यांना खूप मिस करू.” असं एएनआयशी बोलताना उमा कृष्णन म्हणाल्या.

उमा यांच्या या प्रतिक्रियेत विजय यांच्या लाखो चाहत्यांच्या भावना दिसून आल्या. ‘जन नायकन’ हा केवळ एक चित्रपट नसून, तमिळ सिनेमातील एका मोठ्या कलाकाराच्या प्रवासातील खास अध्याय मानला जात आहे.

 

त्रिशा कृष्णनने शेअर केली थिएटरमधील खास झलक

‘जन नायकन’ हा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री त्रिशा कृष्णन खूप आनंदी दिसली. तिच्या एक मैत्रिणीने त्या तिघींचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. या फोटोमध्ये त्रिशा ही तिच्या दोन मैत्रिणींसोबत दिसत आहेत. “जन नायकन एक वेडेपणा आहे. त्रिशा आणि निरुपमासोबत खूप एन्जॉय केले.” असं मैत्रिणीने लिहीलं. तर चित्रपटातील लोकप्रिय गाणे ‘थलापती कचेरी’ सोबत त्रिशाने देखीली ही पोस्ट री-शेअर केली.

थलापती विजय यांच्या सिनेमॅटिक प्रवासाचा भावनिक टप्पा

थलापती विजय यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. आपल्या दमदार अभिनयाने, जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्सने, डान्स आणि मास एंटरटेनर चित्रपटांमधून त्यांनी कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यामुळे ‘जन नायकन’ विजय यांच्या चाहत्यांसाठी केवळ नवीन चित्रपट नाही, तर त्यांच्या आवडत्या अभिनेत्याच्या सिनेमातील प्रवासातील एक भावनिक क्षण बनला आहे.

 

Follow Us