माझी मान शरमेनं झुकली; तालिबान मंत्र्याचं भारतात भव्य स्वागत पाहून भडकले जावेद अख्तर

तालिबानच्या मंत्र्याचं भारतात भव्य स्वागत झाल्याचं पाहून जावेद अख्तर भडकले आहेत. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित त्यांनी राग व्यक्त केला आहे. माझी मान शरमेनं झुकली आहे, असं ते म्हणाले.

माझी मान शरमेनं झुकली; तालिबान मंत्र्याचं भारतात भव्य स्वागत पाहून भडकले जावेद अख्तर
Javed Akhtar and Taliban Minister
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 14, 2025 | 11:23 AM

उत्तर प्रदेशातील देवबंद इथं अफगाणिस्तानचे तालिबान परराष्ट्र मंत्री आमीर खान मुत्ताकी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यावरून दिग्गज गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “माझी मान शरमेनं झुकली आहे”, असं त्यांनी म्हटलंय. तालिबानी प्रतिनिधींना भारतात देण्यात आलेला सन्मान आणि केलेलं त्यांचं स्वागत हे अत्यंत चिंताजनक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. “जगातील सर्वांत क्रूर दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानच्या प्रतिनिधीला भारतात दिलेला सन्मान पाहून माझी मान शरमेनं झुकली आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

जावेद अख्तर यांची पोस्ट-

‘जगातील सर्वांत क्रूर दहशतवादी संघटना तालिबानच्या प्रतिनिधीला सर्व प्रकारच्या दहशवाद्यांच्या विरोधात व्यासपीठावर बसून ज्याप्रकारे आदर दिला गेला आणि स्वागत केलं गेलं.. ते पाहून माझी मान शरमेनं झुकली आहे. मुलींच्या शिक्षणावर पूर्णपणे बंदी घालणाऱ्यांपैकी एक असलेल्या त्यांच्या इस्लामिक हिरोचं इतकं आदरपूर्वक स्वागत केल्याबद्दल मला देवबंदचीही लाज वाटते. माझ्या भारतीय बंधू आणि भगिनींनो.. आपल्यासोबत हे काय चाललंय’, असा सवाल त्यांनी केला आहे.

जावेद अख्तर यांनी सहारनपूर इथल्या दारुल उलूम देवबंदवरही निशाणा साधला आहे. हा दक्षिण आशियातील सर्वांत प्रभावशाली इस्लामिक मदरशांपैकी एक आहे. ‘दहशतवाद आणि हिंसाचाराच्या विरोधात नेहमीच उभं राहण्याचं उदाहरण देणारी ही संस्था या इस्लामिक नायकाचं भव्य स्वागत करतेय’, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांचा भारत दौरा अनेक कारणांमुळे चर्चेत आला आहे. शैक्षणिक आणि महिला हक्कांवरील त्यांच्या धोरणांवर अनेक देशांकडून टीका झाली आहे. त्यांच्या भेटीदरम्यान महिला पत्रकारांना त्यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्यापासून रोखण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तालिबान निर्बंध समितीने तालिबान नेते आमिर खान मुत्ताकी यांच्यावर प्रवासबंदी लादली होती. या बंदीतून सूट मंजूर केल्यानंतर मुत्ताकी यांनी भारताला भेट दिली. 25 जानेवारी 2001 रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं त्यांच्यावर प्रवासबंदी आणत त्यांची मालमत्ता गोठवली होती.