भारत-पाकिस्तान मॅचनंतरच्या ट्विटमुळे जावेद अख्तर ट्रोल; थेट म्हणाले ‘देशप्रेम काय असतं हे..’

भारत-पाकिस्तान मॅचनंतर रविवारी लेखक जावेद अख्तर यांनी विराट कोहलीचं कौतुक करणार ट्विट लिहिलं. मात्र त्यावर काही नेटकऱ्यांनी नकारात्मक कमेंट केली. अशा ट्रोलर्सना अख्तर यांनीसुद्धा सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांचं ट्विट सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

भारत-पाकिस्तान मॅचनंतरच्या ट्विटमुळे जावेद अख्तर ट्रोल; थेट म्हणाले देशप्रेम काय असतं हे..
Javed Akhtar and Virat Kohli
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 24, 2025 | 3:08 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारताने पाकिस्तानवर सहा गडी राखून मात केली. विराट कोहलीने 111 चेंडूत नाबाद 100 धावा अशी अप्रतिम खेळी केली. या विजयानंतर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंची प्रशंसा केली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक जावेद अख्तर यांनीसुद्धा विराटसाठी खास पोस्ट लिहिली. ‘विराट कोहली, जिंदाबाद! आम्हा सर्वांना तुझा खूप अभिमान आहे’, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं. मात्र जावेद यांच्या या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी नकारात्मक टिप्पण्या केल्या. तेव्हा आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जाणारे अख्तर यांनीसुद्धा ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं.

‘जावेद, बाबर का बाप कोहली है. बोलो, जय श्रीराम (जावेद, बाबरचा बाप कोहली आहे, बोला जय श्रीराम)’ अशी कमेंट एका युजरने केली. जावेद अख्तर यांच्या धर्मावर निशाणा साधत ही कमेंट करण्यात आली होती. त्यावर नेटकऱ्याला सुनावत अख्तर यांनी लिहिलं, ‘मी तर फक्त हेच म्हणेन की तू एक नीच व्यक्ती आहेस आणि नीच म्हणूनच मरशील. देशप्रेम काय असतं हे तुला काय माहिती? ‘

कोहलीचं कौतुक केल्याबद्दल आणखी एका युजरनेही जावेद अख्तर यांना टोमणा मारला. ‘आज सूर्य कुठून उगवला आहे? आतून तुम्हाला दु:ख होत असेल ना’, अशी कमेंट त्या युजरने केली. अख्तर यांनी या नेटकऱ्यालाही स्पष्ट शब्दांत सुनावलं. “बेटा, जेव्हा तुझे वडील, आजोबा इंग्रजांचे बूट चाटायचे तेव्हा माझे वडील-आजोबा देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात आणि काळ्या पाण्याच्या शिक्षेत होते. माझ्या नसानसांत देशप्रेमींचं रक्त आहे आणि तुझ्या नसानसांत इंग्रजांच्या नोकरांचं रक्त आहे. या फरकाला विसरू नकोस”, अशा शब्दांत अख्तर यांनी सुनावलं. जावेद अख्तर यांनी अशा पद्धतीने नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला उत्तर द्यायची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेकदा टीका करणाऱ्यांना फटकारलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवल्याने भारताचं उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झालं असून पाकिस्तानचा संघ गारद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. दुबई इथं झालेल्या या सामन्यात पाकिस्तानला 241 धावांत रोखल्यानंतर भारताने 42.3 ओव्हरसमध्ये 4 बाद 244 धावा करत विजय साकारला.