जितेंद्र यांनी पूर्ण केली कॅन्सरग्रस्त ज्युनिअर मेहमूद यांची शेवटची इच्छा; भावूक करणारे क्षण

ज्युनिअर मेहमूद हे गेल्या दोन महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती बरीच खालावली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांची अखेरची इच्छा बोलून दाखवली होती. ही इच्छा आता ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांनी पूर्ण केली आहे.

जितेंद्र यांनी पूर्ण केली कॅन्सरग्रस्त ज्युनिअर मेहमूद यांची शेवटची इच्छा; भावूक करणारे क्षण
Jeetendra and Junior Mehmood
Image Credit source: Twitter
| Updated on: Dec 07, 2023 | 8:27 AM

मुंबई : 7 डिसेंबर 2023 | दिग्गज अभिनेते ज्युनिअर मेहमूद हे गेल्या काही काळापासून स्टेज 4 लिव्हर आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरने ग्रस्त आहेत. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली. दिवसेंदिवस प्रकृती खालावत असल्याने ज्युनिअर मेहमूद यांनी याआधी त्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. सचिन पिळगावकर हे त्यांचे बालपणीचे मित्र आहेत, तर जितेंद्र यांच्यासोबत त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. मेहमूद यांना नोव्हेंबरमध्ये कॅन्सरचं निदान झालं आणि तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वीच ज्युनिअर मेहमूद यांनी जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. दोन्ही कलाकारांना त्यांच्या या इच्छेबद्दल कळताच त्यांनी मेहमूद यांची भेट घेतली. मंगळवारी सकाळी या दोघांनी ज्युनिअर मेहमूद यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. सचिन पिळगावकर यांनी काही मदत लागल्यास बिनधास्तपणे सांगण्याचं आवाहन त्यांन केलं. मात्र सलाम काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहमूद यांच्या मुलांनी त्यांची मदत नाकारली आणि वडिलांसाठी फक्त प्रार्थना करण्यास सांगितलं. बालकलाकार म्हणून ज्युनिअर मेहमूद आणि सचिन पिळगावकर यांची जोडी फार लोकप्रिय होती. त्यांनी ‘बचपन’, ‘गीत गाता चल’ आणि ‘ब्रह्मचारी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.

माजी पत्रकार आणि निर्माते खालिद मेहमूद यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट लिहित ज्युनिअर मेहमूद यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितलं होतं. ‘ज्युनिअर मेहमूद हे कॅन्सरशी झुंज देत असून त्यांना जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा आहे. जितेंद्र साहब आणि सचिनजी यांनी कृपया त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करावी’, असं त्यांनी लिहिलं होतं. त्यावर सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकरने त्यांना उत्तर दिलं होतं. ‘बाबा त्यांच्या संपर्कात आहेत आणि आज त्यांनी त्यांची भेट घेतली’, असं तिने सांगितलं.

जितेंद्र आणि ज्युनिअर मेहमूद यांनी ‘सुहाग रात’, ‘सदा सुहागन’, ‘कारवाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांची भेट घेतल्यानंतर जितेंद्र म्हणाले, “मी त्यांची भेट घेतली पण ते मला ओळखू शकले नाहीत. ते प्रचंड वेदनेत होते आणि त्यांचे डोळे उघडू शकत नव्हते. त्यांना अशा अवस्थेत पाहून माझं हृदय पिळवटून निघालं. मी गेल्या 25 वर्षांपासून माऊंट मेरी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जातोय. जेव्हा मला ज्युनिअर मेहमूद यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळाली, तेव्हा दुसऱ्याच रविवारी चर्चला जाताना त्यांची भेट घेण्याचं ठरवलं होतं.”