
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत लोकप्रिय ठरलेली जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या खासगी आयुष्याविषयी सध्या बरीच चर्चा होत आहे. लग्नाच्या वर्षभरानंतरच हे दोघं घटस्फोट घेत असल्याचं म्हटलं जातंय. या चर्चांना उधाण येण्यामागचं कारण म्हणजे योगिता आणि सौरभ यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलंय. इतकंच नव्हे तर त्यांनी सोशल मीडियावरील लग्नाचे फोटोसुद्धा डिलिट केले आहेत. त्यामुळे दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर योगिताची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
योगिता आणि सौरभ यांची पहिली भेट ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. मालिकेत एकत्र काम करता करता त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका संपल्यानंतर दोघांनी मार्च 2024 मध्ये लग्नगाठ बांधली. आता लग्नाला दीड वर्ष होत नाही तोवर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. ‘न्यूज 18 लोकमत’ने दिलेल्या वृत्तानुसार, योगिताने घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं नसल्याचं तिने सांगितलं आहे. तर याप्रकरणी सौरभशी संपर्क होऊ शकला नाही.
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत योगिता चव्हाण नायिका म्हणून झळकली होती. सर्वगुणसंपन्न, हवीहवीशी वाटणाऱ्या तिच्या अंतरा या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनमध्येही तिचा चांगलाच बोलबाला होता. परंतु हा शो तिने मध्यातच सोडला होता. सातारकर असणाऱ्या योगिताचा जन्म ठाण्यात झाला आहे. नृत्यात करिअर करण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमात ती सहभागी झाली. इंडस्ट्रीत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून तिने काम सुरू केलं. तर दुसरीकडे सौरभचा जन्म मालवणमध्ये झाला. त्याने इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलंय. परंतु अभिनयाची प्रचंड आवड असल्याने तो मुंबईत आला. त्याने मॉडेलिंगने करिअरची सुरुवात केली. मॉडेलिंगसोबतच तो विविध नाटकांमध्येही काम करत होता.