जेनिफर विंगेटशी परिणीतीचा वाद चव्हाट्यावर? सर्वांसमोर दिली अशी वागणूक, अभिनेत्रीने सोडलं मौन
‘शक: ट्रस्ट नो वन’ या सीरिजमध्ये परिणीती आणि जेनिफर दोघींनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या सीरिजच्या यशानिमित्त आयोजित पार्टीतून सुरू झालेली चर्चा आता जेनिफरच्या स्पष्टीकरणामुळे पुन्हा एकदा मनोरंजनविश्वात चर्चेचा विषय ठरली आहे.

Jennifer Winget: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. नेटफ्लिक्सवरील ‘शक: ट्रस्ट नो वन’ या वेब सीरिजच्या सक्सेस पार्टीतील केक कटिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली. या व्हिडीओमध्ये परिणीती केक कापताना दिसत असून जेनिफर तिच्या मागे उभी असल्याचं पाहायला मिळालं. यावरून काही नेटकऱ्यांनी परिणीतीने जेनिफरला दुर्लक्षित केल्याचा आरोप केला. मात्र, आता जेनिफरने स्वतः पुढाकार घेत या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच, विनाकारण नकारात्मकता पसरवू नका, असं आवाहनही तिने केलं आहे.
केक कटिंग व्हिडीओमुळे सुरू झाली चर्चा
‘शक: ट्रस्ट नो वन’ या वेब सीरिजच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईत कलाकार आणि निर्मात्यांनी खास पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला परिणीती चोप्रा, जेनिफर विंगेट, हरलीन सेठी, ताहिर राज भसीन आणि अनूप सोनी यांच्यासह मालिकेतील इतर कलाकार उपस्थित होते. या सेलिब्रेशनमधील केक कटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला. त्यामध्ये परिणीती इतर कलाकारांसोबत केक कापताना दिसत होती, तर जेनिफर मागे उभी असल्याचं दिसलं. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये परिणीती उपस्थितांना केक भरवताना दिसली. मात्र, जेनिफरला केक भरवण्यात आलं नसल्याचं काही नेटकऱ्यांनी लक्षात आणून दिलं.
हाच तो व्हिडीओ
यानंतर सोशल मीडियावर विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली. काही जणांनी परिणीतीच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी जेनिफरच्या अभिनयाचं कौतुक होत असल्यामुळे दोघींमध्ये मतभेद असल्याचा अंदाज व्यक्त केला. या चर्चांदरम्यान जेनिफर विंगेटने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. तिने लिहिलं, “चला, आपण एकमेकांशी अधिक प्रेमाने वागुयात. नकारात्मकता पसरवणं बंद करा आणि नसलेल्या गोष्टीला वेगळं स्वरूप देऊ नका.” पुढे जेनिफरने सांगितलं की, त्या ठिकाणी पुरेशी जागा नसल्यामुळे ती स्वतःहून मागे झाली होती. परिणीतीबद्दल तिच्या मनात कोणतीही नाराजी नसल्याचंही तिने स्पष्ट केलं.
“परी नेहमीच माझ्याशी प्रेमाने आणि आपुलकीने वागली आहे. आमच्यात फक्त प्रेम आहे. आम्ही एक टीम आहोत आणि एकमेकांना खाली न खेचता आपल्या प्रत्येकाला चमकण्यासाठी पुरेशी संधी आहे,” अशा शब्दांत जेनिफरने परिणीतीसोबतच्या नात्याबद्दल सांगितलं. जेनिफरने स्पष्टीकरण दिल्यानंतर दोघींमधील वादाच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रकरणावर परिणीती चोप्राने अद्याप सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.