‘तारक मेहता..’ला जेठालालचा रामराम, शो सोडतायत दिलीप जोशी? अखेर निर्मात्यांनी सोडलं मौन

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी मालिकेला रामराम केल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चांवर अखेर मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी मौन सोडलं आहे.

तारक मेहता..ला जेठालालचा रामराम, शो सोडतायत दिलीप जोशी? अखेर निर्मात्यांनी सोडलं मौन
Dilip Joshi and AsitKumar Modi
Image Credit source: Instagram
Updated on: Jul 21, 2025 | 10:09 AM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 16-17 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. गेल्या काही आठवड्यांपासून टीआरपीच्या यादीतही ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. या मालिकेच्या सुरुवातीपासून अभिनेते दिलीप जोशी त्यात ‘जेठालाल’ची भूमिका साकारत आहेत. परंतु गेल्या काही एपिसोड्सपासून ते मालिकेतून गायब आहेत. त्यांच्यासोबतच बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्तासुद्धा मालिकेत दिसली नाही. त्यामुळे चाहत्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत.

दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता ही मालिका सोडत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे चाहते खूप निराश झाले आहेत. या चर्चांवर आता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “तारक मेहता.. या मालिकेबद्दलची एखादी बातमी समोर आली की ती जरा जास्तच व्हायरल होते. अनेकदा मालिकेबद्दल संवेदनशील आणि गैरसमज पसरवणाऱ्या गोष्टीही लिहिल्या जातात. प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर, या गोष्टींचा मी फार विचार करत नाही. जर प्रत्येक अफवेवर उत्तर देऊ लागलो, तर हे सर्व कधीच संपणार नाही.”

‘मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे त्यांच्या काही वैयक्तिक कारणांमुळे काही एपिसोड्समध्ये दिसले नव्हते. याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी मालिकाच सोडली आहे. फक्त एकाच भूमिकेच्या अवतीभवती कथा चालवणं आम्हाला शक्य होत नाही. लोक लगेच अंदाज बांधू लागतात. परंतु मी फक्त मालिकेच्या कथेवर लक्ष केंद्रीत करतो. अशा प्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष करणंच मी योग्य समजतो’, असं त्यांनी स्पष्ट केलं.

याआधी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत निर्माते म्हणाले होते, “असं काहीच नाही. सर्वजण आमच्या टीमचा भाग आहेत. त्यांची काही वैयक्तिक कारणं होती, ज्यामुळे ते मालिकेच्या शूटिंगला उपस्थित राहू शकले नव्हते. परंतु त्यांनी मालिकाच सोडल्याच्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. आजकाल सोशल मीडिया खूप नकारात्मक झाला आहे. परंतु तुम्हाला तुमचे विचार सकारात्मक ठेवावे लागतील. आमची ही मालिकासुद्धा सकारात्मक विचारांची आहे. या मालिकेचे एपिसोड्स पाहून लोक त्यांचं टेन्शन विसरतात. त्यामुळे किमान या शोबद्दल तरी काही नकारात्मक बातम्या पसरवू नका. छोट्या-छोट्या गोष्टींमधून अफवा पसरवणं बरं नाही.”