नामदेव ढसाळ कोण? विचारणाऱ्याला चपराक रंगवायला हवी होती- जितेंद्र आव्हाड

सेन्सॉर बोर्डातील काही अधिकाऱ्यांनी एका चित्रपटातील नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आक्षेप घेत 'नामदेव ढसाळ कोण' असा प्रश्न केला होता. त्यावर राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

नामदेव ढसाळ कोण? विचारणाऱ्याला चपराक रंगवायला हवी होती- जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 28, 2025 | 4:46 PM

‘चल हल्ला बोल’ या चित्रपटासाठी बंडखोर कवी आणि दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांनी कविता लहिल्या होत्या. त्यांच्या कवितांचा वापर सिनेमामध्ये करण्यात आला. जेव्हा हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाकडे गेला तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी या नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आक्षेप घेत ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असा सवाल केला होता. त्यांच्या या प्रश्नावर सध्या सर्वच स्तरांमधून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाच्या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत, ‘नामदेव ढसाळ कोण होता? असा सवाल विचारणाराच्या त्या निर्मात्याने कानशिलात चपराक रंगवायला हवी होती आणि सांगायला हवं होतं की हा आहे नामदेव ढसाळ.’

नुकताच जितेंद्र आव्हाड यांनी सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयामध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि सांगितले की, ‘नामदेव ढसाळ कोण आहेत ते, यासोबतच सोमवारी पाच वाजता सिंचन बोर्डाचे जे सीईओ आहेत त्यांची आणि माझी भेट होणारे. त्या भेटीमध्ये या सगळ्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावणार आहे. सरकारला जर एवढीच पडली असेल तर त्यांनी या मुर्ख अधिकाऱ्याला दिल्लीला पाठवा. हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. आपण सगळे षंड बनलो आहोत आणि याला जर वाचा फोडली नाही तर आपल्याला षंड बनून आयुष्य जगावं लागेल.’

काय आहे प्रकरण?

‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट १ जुलै २०२४ रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डकडे सबमिट करण्यात आला होता. पण चित्रपटातील कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मांडले. त्यानंतर या कविता नामदेव ढसाळ यांनी लिहिल्याची माहिती देण्यात आली होती. त्यावर अधिकाऱ्यांनी, ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असे उत्तर दिल्याचे समोर आले.