Sharad Kapoor: ‘जोश’ फेम शरद कपूरचं नशीब पालटलं; काम मागताच थेट मिळाली सर्वांत मोठी ऑफर
'जोश'मध्ये भूमिका साकारलेले अभिनेते शरद कपूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील त्यांची अवस्था पाहून चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती.

Sharad Kapoor: बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, कालांतराने काही कलाकारांना काम मिळणं कठीण होतं. असाच काहीसा अनुभव अभिनेता शरद कपूर यांना येत होता. शाहरुख खानच्या ‘जोश’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेल्या शरद कपूर यांचा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी सिनेसृष्टीतील लोकांकडे काम मिळवून देण्यासाठी मदतीचं आवाहन केलं होतं. त्यांच्या या व्हिडीओची बरीच चर्चा झाली. मात्र, आता शरद कपूर यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
कामासाठी केलं होतं सोशल मीडियावर आवाहन
शरद कपूर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होते. त्यामुळे त्यांना पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेसृष्टीतील कलाकार आणि निर्मात्यांना काम देण्याचं आवाहन केलं होतं. अभिनेता जया भट्टाचार्य यांनीही त्यांची भेट घेतली होती. यावेळी शरद यांनी सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनकडे (CINTAA) काम मिळवून देण्यासाठी मदत मागितली होती. मला चांगल्या कामाची गरज आहे. मला आर्थिक मदत नको, तर पुन्हा अभिनय करण्याची संधी हवी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
थेट हॉलिवूड चित्रपटाची मिळाली ऑफर
दरम्यान, शरद कपूर यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. त्यांना एका हॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाली असून जानेवारी 2027 मध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, हा त्यांचा पहिलाच हॉलिवूड चित्रपट असणार आहे. याबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की, हॉलिवूड प्रोजेक्टसोबतच त्यांना बॉलिवूडमध्येही काम करायचं आहे. ही माझी इंडस्ट्री आहे आणि इथल्या लोकांना मी माझं कुटुंब मानतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सात वर्षे न्यूयॉर्कमध्ये होते वास्तव्यास
शरद कपूर यांनी मुलाखतीत सांगितलं की, ते मागील सात वर्षांपासून न्यूयॉर्कमध्ये राहत होते. साधारण वर्षभरापूर्वी ते भारतात परतले. त्यामुळे भारतीय मनोरंजनविश्वात पुन्हा काम मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागत होते. काम मागण्यात मला कोणतीही लाज वाटत नाही. चांगलं काम मिळावं, एवढीच माझी इच्छा आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
फुटबॉल खेळताना झाली दुखापत
शरद कपूर यांच्या अडचणींमध्ये त्यांच्या दुखापतीचीही भर पडली. बार्सिलोनामध्ये फुटबॉल खेळताना दुसऱ्या खेळाडूचा पाय त्यांच्या पायाला लागला आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी दोन महिने बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. याच दुखापतीमुळे त्यांना त्यांच्या चार पाळीव कुत्र्यांची योग्य काळजी घेणंही शक्य होत नव्हतं. त्यामुळे काही काळासाठी त्यांनी कुत्र्यांना एनिमल शेल्टरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना पुन्हा घरी आणण्याचा त्यांचा विचार आहे. शरद कपूर यांनी मुंबईतील सध्याचं घर विकून मड आयलंड परिसरातील सात बेडरूमच्या मोठ्या बंगल्यात राहायला जाण्याची योजनाही सांगितली आहे. या घरात त्यांच्या पाळीव कुत्र्यांना पुरेशी जागा मिळेल.
दरम्यान, ‘दस्तक’, ‘जोश’, ‘लक्ष्य’ आणि ‘जय हो’ यांसारख्या चित्रपटांमधून शरद कपूर यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. आता हॉलिवूडमधील पदार्पणामुळे त्यांच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.