
अभिनेते कबीर बेदी यांच्या मुलाला स्किझोफ्रेनियाचं (Schizophrenia) निदान झालं होतं. त्याला या आजारपणातून बरं करण्यासाठी कबीर आणि त्यांच्या पत्नीने खूप प्रयत्न केले होते. परंतु त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले. कबीर बेदी यांचा मुलगा सिद्धार्थने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. सिद्धार्थ हा कबीर बेदी आणि त्यांची पहिली पत्नी प्रोतिमा यांचा मुलगा होता. आजारपणाला कंटाळून वयाच्या 26 व्या वर्षी त्याने आत्महत्या केली होती.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत मुलाविषयी कबीर म्हणाले, “स्किझोफ्रेनियाचं कारण काय, हे मेडिकलदृष्ट्या कोणालाच माहीत नाही. त्याचे उपचार काय आहेत? आजकाल तंत्रज्ञान आणि औषधोपचार यामध्ये बरीच सुधारणा झाली आहे. परंतु माझ्या मुलाच्या वेळी तेवढी त्याबद्दलची माहिती नव्हती. त्याचं बालपण सर्वसामान्य होतं. तो खूप हुशार मुलगा होता. आम्ही त्याला कार्नेगी मेलॉन विद्यापीठात शिक्षणासाठी पाठवलं जातं, जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं मक्का मानलं जातं. त्याचवेळी त्याला स्किझोफ्रेनियाचं निदान झालं होतं. मी माझ्या पुस्तकात त्याविषयी सविस्तर लिहिलंय. एक पिता त्याच्या मुलाला कशा पद्धतीने आत्महत्येपासून वाचवू पाहतो, हे त्यात मी लिहिलंय.”
“मुलगा म्हणतो, मला हे आयुष्य जगायचं नाही. मी माझं आयुष्य अशा पद्धतीने जगावं हे मला अस्वीकार्य आहे, असं मुलाला वाटत असतं. पालक तरी अशा प्रश्नांची उत्तरं काय देणार? कॅलिफोर्निया मेडिकलमधून त्याच्यावर उपचार सुरू होते. तो बरा होईल अशी आशा होती. परंतु जी औषधं दिली जायची, त्यामुळे रुग्णावर खूप परिणाम व्हायचा. त्याला असं वाटायचं की कोणीतरी त्याला ड्रग्ज दिले आहेत. जेव्हा तो औषधं खात नव्हता, तेव्हा त्याला वाटायचं की मी नॉर्मल आहे. परंतु त्याच्यासाठी नॉर्मल ही वेगळी गोष्ट आहे. प्रत्येकासाठी ते नॉर्मल असू शकत नाही. त्यामुळे त्याला औषधं देताना खूप संघर्ष करावा लागायचा. तुम्ही त्याच्यासाठी विलेन बनता”, असं त्यांनी पुढे सांगितलं.
“या जगातली सर्व दु:ख आणि वेदना एकीकडे आणि आपल्या पोटच्या मुलाला गमावण्याचं दु:ख एकीकडे असतं. त्याची कल्पना कोणीच करू शकत नाही. तुमच्या शरीरातला एक अवयवच उखडून टाकल्यासारखं वाटतं. यापेक्षा अधिक दु:खद काहीच असू शकत नाही”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.