
दिग्गज अभिनेते कमल हासन सध्या त्यांच्या आगामी ‘ठग लाइफ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री त्रिशा कृष्णन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत या दोघांना लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना आधी त्रिशाने सांगितलं, “मला लग्नसंस्थेवर विश्वास नाही. जर लग्न होत असेल तर ठीक आहे, पण जर होत नसेल तरी ठीक आहे.” यानंतर कमल हासन यांना लग्नाबाबत विचारलं असता, त्यांनी काही वर्षांपूर्वीचा एक किस्सा सांगितला. एमपी जॉन ब्रिटास यांच्यासोबतचा किस्सा सांगताना त्यांनी दोन लग्नाबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
कमल हासन म्हणाले, “ही 10-15 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एमपी ब्रिटास माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या एका समूहासमोर मला प्रश्न विचारला होता की, तुम्ही एका चांगल्या ब्राह्मण कुटुंबातून आहात, मग तुम्ही दोन वेळा लग्न कसं केलं? त्यावरून मी त्यांना विचारलं, चांगल्या कुटुंबातून येण्याचा आणि लग्नाचा काय संबंध आहे? तेव्हा ते म्हणाले, नाही.. पण तुम्ही भगवान रामाची पूजा करता, म्हणून तुम्ही त्यांच्यासारखेच जगत असाल. हे ऐकून मी त्यांना उत्तर दिलं की, सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे मी कोणत्याच देवाची पूजा करत नाही. मी रामाच्या मार्गावर चालत नाही. कदाचित मी त्यांचे वडील दशरथ यांच्या मार्गावर चालतो.”
कमल हासन यांनी 1978 मध्ये वाणी गणपतीशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 10 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर कमला हासन यांनी अभिनेत्री सारिका यांच्याशी लग्न केलं. या दोघांना दोन मुली आहेत. 1986 मध्ये सारिका यांनी श्रुतीला जन्म दिला. त्यानंतर पाच वर्षांनी अक्षरा हासनचा जन्म झाला. सारिका यांच्यासोबतचाही कमल हासन यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. 2002 मध्ये हे दोघं विभक्त झाले आणि 2004 मध्ये त्यांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला. सारिक यांच्याशी घटस्फोटानंतर कमल हासन यांचं नाव अभिनेत्री गौतमीसोबत जोडलं गेलं. या दोघांनी 2005 ते 2016 पर्यंत एकमेकांना डेट केल्याचं म्हटलं जातं.