
कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘कांतारा’ या चित्रपटाचा प्रीक्वेल थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या वर्षातील हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा चित्रपट आहे. पहिल्या भागात जी कथा दाखवण्यात आली, त्याच्या आधीची कथा आता या प्रीक्वेलमध्ये पहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी साहसदृश्यांसाठी खास देशविदेशातील तज्ज्ञांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शनसुद्धा ऋषभनेच केलंय. यामध्ये त्याच्यासोबत रुक्मिणी वसंत, जयराम, गुलशन देवैया आणि प्रमोद शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित झाला आहे.
‘कांतारा : चाप्टर वन’ या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आणखी खोलवर घेऊन जाते आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं देते, अशी पहिली प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे. ‘पहिल्या भागात उपस्थित झालेले सर्व प्रश्न दुसऱ्या भागात स्पष्ट करण्यात आले आहेत’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. याशिवाय चित्रपटाचं संगीत, पार्श्वसंगीत, छायांकन आणि व्हीएफएक्स यांचंही विशेष कौतुक होत आहे. या चित्रपटातील भव्य-दिव्य सीन्सचं आणि एकंदरीत थीमचं प्रेक्षकांनी कौतुक केलंय. अभिनयाबद्दल बोलायचं झाल्यास, ऋषभ शेट्टीच्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. तर अभिनेत्री रुक्मिणी वसंतनेही उल्लेखनीय काम केलंय.
‘कांतारा- चाप्टर 1’बद्दलच्या प्रतिक्रिया सर्वच सकारात्मक नाहीत. चित्रपट समीक्षक उमैर संधू यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ट्विट करत म्हटलंय, ‘प्रत्येक चमचमणारी वस्तू सोनं नसते. ओवररेटेड आणि विचित्र प्रकारचा चित्रपट.’ या ट्विटवरून हे स्पष्ट होतंय की ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाबद्दल दोन वेगवेगळी मतं पहायला मिळत आहेत. एखाद्या चित्रपटाच्या यशात माऊथ पब्लिसिटीचा मोठा वाटा असतो. ‘दशावतार’सारखा मराठी चित्रपट त्याचं स्पष्ट उदाहरण आहे. त्यामुळे आता ‘कांतारा- चाप्टर 1’बाबत येत्या काही दिवसांत माऊथ पब्लिसिटी किती आणि कशी होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘कांतारा- चाप्टर 1’बद्दल विविध मतं जरी असली तरी ॲडव्हान्स बुकिंगने सर्वांनाच चकीत केलंय. ‘मनी कंट्रोल’ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारपासून या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली असून पहिल्याच दिवशी 1.7 लाख तिकिटं विकली गेली आहेत. यातून जवळपास 5.7 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ने पहिल्या दिवशी फक्त 2 कोटी रुपये कमावले होते. इतकंच नाही तर या चित्रपटाने ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या ‘वॉर 2’ आणि पवन कल्याण यांच्या ‘दे कॉल हिम ओजी’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांनाही ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत मागे टाकलंय.