‘अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार द्या..’; ‘केसरी चाप्टर 2’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

अक्षय कुमारचा 'केसरी चाप्टर 2' हा चित्रपट पाहिलेल्यांनी त्यावर दिलखुलास प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटातील जबरदस्त कामगिरीसाठी अक्षयला राष्ट्रीय पुरस्कार देण्याची मागणी प्रेक्षकांनी केली आहे. 18 एप्रिल रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय.

अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार द्या..; केसरी चाप्टर 2 पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
Akshay Kumar in Kesari Chapter 2
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 17, 2025 | 10:25 AM

अक्षय कुमार, अनन्या पांडे आणि आर. माधवन यांचा ‘केसरी: चाप्टर 2’ हा चित्रपट 18 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान हा चित्रपट पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर त्यावरून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली असून अनेकांनी त्यातील अक्षयच्या दमदार अभिनयकौशल्याचं कौतुक केलं आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. ‘केसरी: चाप्टर 2’च्या स्पेशल स्क्रिनिंगनंतर सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रियांचा वर्षाव होतोय. याचा चित्रपटाच्या कमाईवर चांगला परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.

‘केसरी: चाप्टर 2 या चित्रपटाचं अप्रतिम स्क्रिनिंग पार पडलं. जनरल डायरचं सत्य आता सर्वांसमोर येणार आहे. अक्षय कुमार, अनन्या पांडे आणि आर. माधवन यांनी खूप चांगलं अभियन केलंय. या स्पेशल प्रीमिअरसाठी केंद्रीय मंत्री हरदीप एस. पुरी आणि अखिलेश मिश्रा यांचे आभार’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘स्क्रिनिंगच्या अखेरीस टाळ्यांचा कडकडाट झाला. या चित्रपटालाही थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून उभं राहून मानवंदना दिली जाणार, याची मला खात्री आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘अक्षय कुमारची ही आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट भूमिका आणि कामगिरी आहे. क्लायमॅक्स पाहून अंगावर काटाच येतो. बॅकग्राऊंड म्युझिक कमालीचं आहे. दोन्ही मुख्य कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे’, असं आणखी एका युजरने लिहिलं आहे.

‘केसरी चाप्टर 2: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करण सिंह त्यागीने केलं असून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने, लिओ मिडीया कलेक्टिव्ह आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी मिळून त्याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात जालियनवाला बाग हत्याकांडबद्दल आजवर कधीच समोर न आलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने दिग्गज वकील सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारली आहे. अक्षयच्या 2019 मधील ‘केसरी’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. रघु पलट आणि पुष्पा पलट यांच्या ‘द केस दॅट शुक द एम्पायर’ या पुस्तकावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. 18 एप्रिल रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.