Video : कपिल शर्माच्या कॅफेवरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, तो आला अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!

कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार झाला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Video : कपिल शर्माच्या कॅफेवरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, तो आला अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
kapil sharma cafe firing
| Updated on: Jul 10, 2025 | 8:45 PM

Kapil Sharma Cafe Firing : कॉमेडियन आणि अभिनेता असलेल्या कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने कॅनडात हा कॅफे चालू केला होता. या कॅफेचे नाव त्याने Kap’s Cafe असे ठेवलेले आहे. कॅफे चालू केल्यानंतर अवघ्या काही दिवसांताच तिथे गोळीबार झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोळीबारात एकूण 10 ते 12 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओही आता समोर आला आहे.

खलिस्तान्याने केला गोळीबार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजितसिंह लड्डी याने घेतली आहे. हरजितसिंह हा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत आहे. हा बीकेआय म्हणजेच बब्बर खालसा इंटरनॅशनलशी जोडला गेलेला आहे. कपिल शर्माने याआधी केलेल्या काही वक्त्यांना विरोध म्हणून लड्डी याने हा हल्ला केला आहे.

गोळीबाराचे नेमके कारण काय?

हरजितसिंह याने हा हल्ला केला असला तरी त्यामागे त्याचा नेमका उद्देश स्पष्ट झालेला नाही. त्याला कपिल शर्माच्या कॅफेवरच गोळीबार करायचा होता? की या गोळीबाराच्या माध्यमातून त्याला कपील शर्माला फक्त धमकी द्यायची होती? हेही स्पष्ट झालेले नाही.

कारमधून आला अन्…

कपिल शर्माच्या Kap’s Cafe या कॅफेवर 9 जुलैच्या रात्री हा गोळीबार झालेला आहे. त्याने नुकतेच या कॅफेचे उद्घाटन केले होते. हा कॅफे म्हणजेद कपिल शर्माचा पहिलाच इंटरनॅशनल रेस्टॉरंट प्रोजेक्ट होता. गोळीबाराची ही घटना घडल्यानंतर तेथे पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एक हल्लेखोर कारमधून आला होता. कारमधून उतरून त्याने थेट गोळीबार चालू केला आणि तिथून फरार झाला.

दरम्यान, कपिल शर्मा याचा द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचे तिसरे पर्व 21 जून रोजी नेटफ्लिक्सवर आलेले आहे. असे असतानाच आता त्याच्या रेस्टॉरंटवर हा हल्ला झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकं काय समोर येणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.