Kingdom : ‘किंग्डम’चा पहिला रिव्ह्यू समोर; विजय देवरकोंडाच्या परफॉर्मन्सने जिंकली मनं

'अर्जुन रेड्डी', 'गीता गोविंदम' यांसारख्या चित्रपटांमधून लोकप्रिय ठरलेला अभिनेता विजय देवरकोंडाचा 'किंग्डम' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री बोरसेनं मुख्य भूमिका साकारली आहे.

Kingdom : किंग्डमचा पहिला रिव्ह्यू समोर; विजय देवरकोंडाच्या परफॉर्मन्सने जिंकली मनं
विजय देवरकोंडा आणि भाग्यश्री बोरसे
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 31, 2025 | 10:47 AM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर अभिनेता विजय देवरकोंडाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु हिंदी सिनेसृष्टीत त्याला अद्याप अपेक्षित असं यश मिळालं नाही. त्याचे मागील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास परफॉर्म करू शकले नाहीत. आता त्याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘किंग्डम’ हा चित्रपट आज (31 जुलै) रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे रिव्ह्यूसुद्धा समोर आले आहेत. विजयने गेल्या काही चित्रपटांमधून चाहत्यांची निराशा केल्यानंतर आता त्याने दमदार कमबॅक केल्याचं या रिव्ह्यूमधून स्पष्ट होतंय.

‘किंग्डम’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी अमेरिकेत त्याचा प्रीमिअर शो पार पडला होता. त्यानंतर प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने सोशल मीडियावर ‘किंग्डम’बद्दल लिहिलं, ‘अमेरिकेत चित्रपटाच्या पूर्वार्धाचे रिव्ह्यू दमदार आहेत. देवरकोंडाच्या चाहत्यांसाठी यापेक्षा चांगली बातमी दुसरी कोणती असू शकत नाही.’ तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, ‘किंगचा बेस्ट परफॉर्मन्स. विजयने दमदार पुनरागमन केलंय. हा एका मास्टरपीस आहे. आपल्या नव्या पॉवरस्टारचं स्वागत!’

या स्पाय थ्रिलर चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केलंय. तर सितारा एंटरटेन्मेंट्स आणि फॉर्च्युन फॉर सिनेमाज बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती नागा वामसी आणि साई सौजन्य यांनी केली आहे. या चित्रपटात विजयने एका अंडरकव्हर कॉन्स्टेबलची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटाची कथा, त्यातील कलाकारांचं अभिनय आणि दिग्दर्शन तर दमदार आहेतच. त्याचसोबत पार्श्वसंगीत आणि अॅक्शन सीन्सचीही विशेष प्रशंसा होत आहे. अनिरुद्ध रविचंदर यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या प्री-रिलीज कार्यक्रमात अनिरुद्ध यांनी या चित्रपटाचं कौतुक करत सर्वांसाठी एक ‘मैलाचा दगड’ ठरल्याचं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी विजयसोबतचा एक किस्सासुद्धा सांगितला होता. ते म्हणाले, “प्रदर्शनाच्या पाच दिवस आधी विजयने मला मेसेज करून विचारलं होतं की मी वेळेवर झोपतोय का, पुरेसा आराम करतोय का? यावरून त्याला टीमची किती काळजी आहे, हे स्पष्ट होतं.”

‘वर्ल्ड फेमस लव्हर’, ‘लायगर’ आणि ‘द फॅमिली स्टार’ यांसारख्या निराशाजनक चित्रपटांनंतर आता विजयच्या ‘किंग्डम’कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाचे सुरुवातीचे रिव्ह्यू पाहिले तर ‘किंग्डम’ हा अभिनेत्याच्या करिअरला पुन्हा रुळावर आणू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे.