रॅपिडो बाईक बुक करताय, थांबा; कल्याणमध्ये तरुणीसोबत घडलं भयंकर
कल्याण पश्चिमेकडील सिंडिकेट परिसरात जिमसाठी निघालेल्या तरुणीसोबत Rapido टॅक्सी चालकाने छेडछाड करत अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. तरुणीच्या आरडाओरडीनंतर नागरिकांनी आरोपीला पकडून बेदम चोप दिला. या घटनेमुळे ॲप-आधारित टॅक्सी सेवांमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कल्याण पश्चिमेतील सिंडिकेट परिसरात सायंकाळी जिमसाठी निघालेल्या एका तरुणीसोबत रॅपिडो (Rapido) बाईक टॅक्सी चालकाने धक्कादायक आणि संतापजनक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या रॅपिडो चालकाने तरुणीला अंधाऱ्या ठिकाणी नेत तिची छेड करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र वेळीच तरुणीने आरडाओरड केल्याने जमा झालेल्या संतप्त नागरिकांनी आरोपी चालकाला भररस्त्यात पकडून बेदम चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील सिंडिकेट परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने संध्याकाळच्या सुमारास आपल्या नेहमीच्या वेळेनुसार जिमला जाण्यासाठी रॅपिडो मोटरसायकल टॅक्सी बुक केली होती. तरुणी या बाईकवर बसल्यानंतर चालकाने तिला ठरलेल्या जिमजवळ न सोडता त्याने कल्याण पश्चिमेकडील पोलीस लाईनजवळील एका निर्मनुष्य आणि अंधाऱ्या ठिकाणी गाडी वळवली.
या अंधाऱ्या ठिकाणी नेत चालकाने तरुणीची छेड काढण्यास सुरुवात केली. तसेच तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. चालकाच्या या अनपेक्षित आणि हिंसक कृतीमुळे तरुणी घाबरली. पण तिने प्रसंगावधान राखत मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
आरडाओरड केल्याने बचावली
यावेळी तरुणीचा आवाज परिसरातील नागरिकांच्या कानी पडताच ते तात्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी चौकशी केली असता तरुणीने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. जमावाने तात्काळ त्या रॅपिडो चालकाला पकडले आणि त्याला जाब विचारत भररस्त्यात बेदम चोप दिला. जमावाच्या या कृतीमुळे सिंडिकेट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या गोंधळाची आणि गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संतप्त जमावाकडून आरोपी चालकाला ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पीडित तरुणीची तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपी रॅपिडो चालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे ओला (Ola), उबर (Uber), रॅपिडो (Rapido) यांसारख्या ॲप-आधारित टॅक्सी सेवांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. तसेच शहरात महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
