‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रोमोलाच रेकॉर्डब्रेक व्ह्यूज

'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता या मालिकेत एक असं वळण येणार आहे, ज्यामुळे पुढील कथानकाविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत मोठा ट्विस्ट; प्रोमोलाच रेकॉर्डब्रेक व्ह्यूज
lagnanantar hoilach prem
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 25, 2026 | 3:02 PM

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ प्रेक्षकांच्या मनात दिवसेंदिवस अधिक घट्ट स्थान निर्माण करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र आणि त्यांची भावनिक गोष्ट प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. लवकरच मालिकेत एक अत्यंत खास आणि भावनिक टप्पा येणार आहे. पार्थ आणि काव्या लवकरच आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी समोर येणार आहे. प्रत्येक नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा आणि सुंदर प्रवास असतो, आणि मालिकेतही याच प्रवासाची सुरुवात होणार आहे. या नव्या वळणाचा प्रोमो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. अवघ्या 24 तासांत या प्रोमोने 5 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवत एक नवा विक्रम रचला आहे. सोशल मीडियावरही या प्रोमोला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून पार्थ-काव्याच्या या नव्या प्रवासासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.

प्रेक्षकांकडून मिळणारं भरभरून प्रेम हे प्रत्येक कलाकारासाठी खूप खास असतं. या प्रतिसादामुळे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेची संपूर्ण टीम आनंद व्यक्त करत असून, मालिकेत येणारं हे नवं वळण प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत भव्य विवाहसोहळा दाखवण्यात आला. जीवा–नंदिनी आणि पार्थ–काव्या यांच्या लग्नाची वरात लालबाग परिसरात ढोल-ताशांच्या गजरात दिमाखात निघाली होती आणि हा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला होता.

पहा मालिकेचा प्रोमो-

विंटेज कार, पारंपरिक लग्नाची गाणी, वऱ्हाडी मंडळी आणि चाहत्यांच्या प्रचंड उपस्थितीत निघालेली ही वरात विशेष आकर्षण ठरली होती. मराठी मालिका विश्वात प्रथमच अशा पद्धतीने थेट प्रेक्षकांसोबत लग्नाचं सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. चाहत्यांचं प्रेम पाहून मालिकेतील सर्वच कलाकार भारावून गेले होते. या आनंदसोहळ्याचा समारोप कलाकारांनी लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेऊन केला होता. या मालिकेत अभिनेता विवेक सांगळे जीवाची भूमिका साकारतोय. तर अभिनेत्री मृणाल दुसानिस नंदिनीच्या भूमिकेत आहे. अभिनेता विजय आंदळकर या मालिकेत पार्थची भूमिका साकारत असून काव्याच्या भूमिकेत ज्ञानदा रामतीर्थकर आहे.

Follow Us