तो जिहादी जिंकला, ट्रम्प यांना मोठा धक्का, अमेरिकेच्या संसदेत पहिल्यांदाच मुस्लिम व्यक्तीची एन्ट्री
अब्दुल अल सैयद हे अमेरिकन सिनेटमध्ये प्रवेश करणारे पहिले मुस्लिम व्यक्ती ठरले आहेत. मिशिगनमधून निवडून येत त्यांनी ट्रम्प समर्थित उमेदवाराला पराभूत केले. ट्रम्प यांनी त्यांना 'जिहादी' म्हटले होते. सैयद यांच्या पत्नीचे कुटुंब कर्नाटकातील असून, त्यांना भारताशी मजबूत नाते आहे. हा विजय अमेरिकेच्या बदलत्या राजकीय भूमीचे प्रतीक आहे.

अमेरिकेच्या संसदेच्या निवडणुकीत पहिल्यांचा मुस्लिम व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. सीनेटच्या निवडणुकीत अब्दुल अल सैयद यांनी विजय मिळवला आहे. सैयद हे पेशाने डॉक्टर आहेत. तसेच परिवर्तनवादी विचाराचे आहेत. मिशिगनमधून लढत असताना सैयद यांनी केलेल्या दिमाखदार कामगिरीने ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष आवाक झाला आहे. त्यांनी रिपब्लिकन पार्टीचे माइक रोजर्स यांना पराभूत केलं आहे. विशेष म्हणजे ट्रम्प हे सैयद यांना जिहादी म्हणायचे. आता तेच सैयद संसदेत पोहोचले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डेमोक्रॅटिक पार्टीने अमेरिकन संसदेच्या वरच्या सभागृहात वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
अब्दुल अल सैयद यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. माझं माझ्या घरांनी, चर्चनी आणि सनेगॉग (ज्यूंचे प्रार्थना स्थळ) ने स्वागत केलं आहे. माझ्या विजयाचं श्रेय आंदोलनाला जातं, असं सैयद म्हणाले. सैयद यांनी दीड वर्ष मिशनिगनच्या मोठ्या शहरांपासून छोट्या गावांपर्यंत प्रचार करून आंदोलन उभं केलं होतं. जेव्हा मी अत्यंत कठिण परिस्थितीतून जात होतो. तेव्हा मला मतदारांनी ताकद दिली, असं त्यांनी सांगितलं.
भारताशी कनेक्शन
अब्दुल सैयद यांचे भारताशीही संबंध आहेत. त्यांनी पत्नी सारा जुकाकू या मनोविकार तज्ज्ञ आहेत. त्यांचे कुटुंबीय कर्नाटकातील आहे. मंगळुरूपासून 140 किलोमीटरवर त्यांचं गाव आहे. सारा या जुकाकू शमशुद्दीन यांची नात आहेत. जुकाकू शमशुद्दीन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बीडी जत्ती यांच्या कार्यकाळात मैसूर राज्याचे वित्त उपमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.
अब्दुल आणि साराची भेट कशी झाली?
अल सैयद हे रोड्स स्कॉलर आहेत. मिशिगन विद्यापीठात सारा आणि सैयद यांची भेट झाली. दक्षिण भारतीय कुटुंब आणि संस्कृतीकडे आपला कसा कल आहे, हे सैयद यांनी साराला सांगितलं. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या विवाहाबद्दल सांगितलं होतं. माझं लग्न एका दक्षिण भारतीय कुटुंबात झालं. त्याला 20 वर्ष झाली आहेत. आता मी या संस्कृतीत मिसळून गेलो आहे. खरं सांगायचं तर अरबी असण्यापेक्षा मी अधिक भारतीय झालो आहे, असं सैयद म्हणाले होते.
जिहादीचा आरोप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैयद यांच्यावर वारंवार टीका केली आहे. सैयद यांचं नाव आणि त्यांच्या धर्मावरून ट्रम्प यांनी त्यांच्यावर नेहमी निशाणा साधला आहे. एवढेच नव्हे तर ट्रम्प यांनी त्यांच्यावर जिहादी असल्याचा आरोपही केला होता. त्यांना सीनेटमध्ये जायचं असेल तर मेटल डिटेक्टरमधून जावं लागेल, असंही ट्रम्प म्हणाले होते. यावर सैयद यांनी थेट उत्तर दिलं होतं. माझ्या टीकाकारांनी गॅस आणि किराणा सामानाच्या वाढत्या किमतीवर बोलण्याऐवजी समाजात फूट पाडण्याची विधाने करण्यावर धन्यता मानली आहे, अशी टीका सैयद यांनी केली होती.
