
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत झळकणारा अभिनेता मेघन जाधवने 2025 या सरत्या वर्षातल्या त्याच्या खास आठवणी आणि अनुभव शेअर केले आहेत. 2025 या वर्षाची माझी सुरुवात ‘लक्ष्मी निवास’ मालिकेपासून झाली. “वर्षाच्या दुसऱ्या दिवशी 2 जानेवारीला मी शूट सुरू केलं आणि 4 जानेवारीला माझी मालिकेत एण्ट्री झाली होती. खरं सांगायचं तर, या वर्षाबद्दल माझ्या मनात एक रिकामी चेकसारखी भावना होती, कारण मागील दोन वर्षे कामाच्या दृष्टीकोनातून फारशी चांगली नव्हती. पण फक्त दोन महिन्यांत, माझी आणि माझ्या सहकलाकार दिव्याची जोडी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय जोडी ठरली आणि आम्ही प्रत्येक माध्यमामध्ये झळकत होतो,” असं तो म्हणाला.
“मी नेहमी स्वतःला म्हणायचो, “एक संधी द्या, मी माझी किंमत सिद्ध करीन”, आणि देवाच्या कृपेने मला ती संधी मिळाली. मला जे काही जमत ते दाखवता आलं याचा खूप आनंद आहे. या वर्षभरात देव खूपच कृपाळू राहिला काही पुरस्कार मिळाले आणि शेवटी माझ्या आयुष्याच्या प्रेमाशी लग्न झालं. त्यामुळे हे वर्ष माझ्यासाठी एका रोलरकोस्टरसारखं सुंदर राहिलं आहे,” अशी भावना मेघनने व्यक्त केली.
2025 या वर्षाने काय शिकवलं, याविषयी सांगताना तो पुढे म्हणाला, “या वर्षाने मला एक अशी गोष्ट शिकवली, ज्याकडे मी याआधी कधीच लक्ष दिलं नव्हतं. ती म्हणजे कृतज्ञता. माझी सहकलाकार दिव्या हिला विचाराल तर तीही हिच गोष्ट सांगेल. कारण रोजच्या रोज आम्ही एकत्र देवाचे आभार मानणं हा आमचा सकाळचा नियम आहे. काम, प्रसिद्धी आणि त्यासोबत येणाऱ्या अनेक गोष्टींपलीकडे जाऊन, या वर्षाने मला सर्वात मोठा धडा दिला. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहणं. आतापर्यंत मी फक्त कामाकडेच लक्ष देत होतो, पण या वर्षाने मला व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल कसा साधायचा हे शिकवलं. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत हे समजलं.”
या वर्षातील सुंदर आठवणी कोणत्या आहेत, याबद्दलही मेघनने सांगितलं. “हे वर्ष असंख्य सुंदर आठवणींनी भरलेलं असल्यामुळे एक निवडणं कठीण आहे. वैयक्तिक आयुष्यात माझी जोडीदार अनुष्का आणि माझं लग्न ही सर्वात खास आठवण आहे. तर व्यावसायिक आयुष्यात ‘लक्ष्मी निवास’सारख्या मोठ्या मालिकेत काम करणं, लोकप्रिय जोडी पुरस्कार मिळणं, सर्वोत्कृष्ट पुरुष पात्र पुरस्कार जिंकणं, गोव्यातील शूटिंग आणि इतर अनेक बाहेरील लोकेशन्स या सगळ्यांनी मला असंख्य सुंदर आठवणी दिल्या. मनापासून सांगायचं तर, मी जे काही नेहमी मनात बाळगून ठेवलेलं होतं ते करण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी खूप आभारी आहे. त्यामुळे मन फक्त कृतज्ञतेने भरलं आहे,” असं तो पुढे म्हणाला.
“जर शक्य असतं तर माझ्या प्रत्येक भावनेला शब्दांत मांडून या वर्षाचे आभार मानले असते. या वर्षात मला काही अतिशय उत्तम लोक भेटले जे आता कुटुंबासारखे झाले आहेत. माझ्या सहकलाकारांपासून ते माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, ज्यांनी नेहमी मला त्या मोठ्या-मोठ्या मंचावर पाहण्याचं स्वप्न पाहिलं, माझ्या मनात त्यांच्याबद्दल अपार प्रेम आहे, विशेषतः माझ्या आई-वडिलांसाठी. आणि हो मला सरप्राइज देणं जितकं आवडतं, तितकंच सरप्राइज घेणंही आवडतं. त्यामुळे येणारं नववर्ष मी कसं साजरं करणार.. हे सुद्धा एक सुंदर सरप्राइजच असेल,” अशा शब्दांत मेघन व्यक्त झाला.