Lalit Prabhakar As Ajmal Kasab : फक्त एक व्हिडिओ, 2 – 3 फोटो अन्…ललितने सांगितला ‘प्रहार’मध्ये कसाबची भूमिका साकारण्याचा अनुभव
मराठी अभिनेता ललित प्रभाकर याने प्रहार या सिनेमात कसाबची भूमिका साकारली ज्यामुळे त्याला प्रचंड यश मिळाले. पण एक चॉकलेट बॉय ते व्हिलन हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. त्याने कसाबच्या भूमिकेसाठी कशी तयारी केली ? त्याला किती कष्ट करावे लागले? हे त्याने सांगितले आहे.

मराठी अभिनेता ललित प्रभाकर सध्या ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबची भूमिका साकारली आहे. आजवर केलेल्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र या सिनेमातील भूमिका पूर्णपणे वेगळी होती. चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असणारा ललित दहशतवाद्याच्या भूमिकेत पाहायला मिळाला. त्याने या सिनेमात उत्तम काम केले आणि त्याची, त्याच्या अभिनयाची चर्चा देशभर रंगली.
ललितने केवळ व्हिडिओ आणि फोटोंच्या आधारे कसाबच्या भूमिकेचा अभ्यास केला. त्याच्या म्हणण्यांनुसार कसाबचा युट्युबर उपलब्ध असलेला एक व्हिडिओ, सार्वजनिक ठिकाणी मिळालेली त्याची 2 – 3 फोटो फक्त याच्याआधारे भूमिकेचा अभ्यास केला. तसेच 26/11 हल्ल्यावर अधिकारी रमेश महाले यांनी लिहिलेलं पुस्तक ’26/11 कसाब आणि मी’ हे पुस्तकही त्याने वाचलं.
या भूमिकेसाठी दिग्दर्शक अविनाश अरूण यांच्याशी ललितने अनेकदा चर्चा केली. कसाबची भूमिका केवळ नाट्यमय पद्धतीने दाखवण्याऐवजी त्याची मानसिकता समजून घेण्यावर दिग्दर्शकांचा भर होता. एखाद्या व्यक्तीचं ब्रेनवॉशिंग कसं होतं, इतके गंभीर गुन्हे केल्यानंतरही एखादी व्यक्ती त्या योग्य समजते का? अशा प्रश्नांवर त्यांनी विचार केला. त्या व्यक्तीचे डोळे, चेहऱ्यावरील भाव आणि वागण्याची पद्धत कशी असेल, याचा अभ्यास केला. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ललितने कसाबच्या भूमिकेसाठी कशी तयारी केली याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले.
ललितच्या मते,कसाबची भूमिका साकारताना सर्वात महत्त्वाचं आव्हान होतं ते त्याची बोलीभाषा आणि बोलण्याचा सूर योग्य प्रकारे पकडणं. कसाबच्या बोलण्यातील वेगळेपणा, आवाजाचा लहेजा आणि उच्चार यावर त्याने विशेष मेहनत घेतली. केवळ संवाद पाठ करणं पुरेसं नव्हतं. तर व्यक्तिरेखेच्या बोलण्यातून तिचा स्वभाव जाणवणंनही महत्त्वाचं होतं.
ललित प्रभाकरने यापूर्वी ‘आनंदी गोपाळ’, ‘हंपी’, ‘टीटीएमए’ आणि झोंबिवली यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या चित्रपटात राजकुमार राव याने सरकारी वकिल उज्ज्वल निकमांची भूमिका साकारली होती. तर अविनाश अरूण यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
प्रहार मध्ये ललितने साकारलेली ही भूमिका त्याच्या अभिनय कारकिर्दितील वेगळा अनुभव ठरली आहे. एका मराठी अभिनेत्याने हिंदी चित्रपटात इतकी संवेदनशील आणि आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारल्यामुळे त्याच्या कामाची चर्चा होत आहे.
