शेवटी डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली.. ‘आमने सामने’ फेम लीना भागवत यांनी कामातून घेतला ब्रेक, चाहत्यांकडून काळजी व्यक्त
Leena Bhagwat: लीना यांनी या ब्रेकला ‘एक छोटासा मध्यांतर’ म्हटलं आहे. काही दिवस आवाजाला विश्रांती दिल्यानंतर त्या पुन्हा ताकदीने रंगमंचावर परतणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेत्री लीना भागवत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने त्यांच्या चाहत्यांना काळजीत टाकलं आहे. रुग्णालयातील फोटो शेअर करत लीना यांनी त्यांच्या आवाजाबाबतची महत्त्वाची माहिती दिली. सध्या त्या काही दिवस रंगभूमीपासून आणि विशेषतः ‘आमने सामने’ या गाजलेल्या नाटकाच्या प्रयोगांपासून दूर राहणार आहेत. आवाजावर ताण येत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्यावर एक छोटी प्रक्रिया करण्यात आली आहे. लीना यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ‘मेरी आवाज ही पहचान है…’ या गाण्याचा उल्लेख करत कलाकारासाठी आवाज किती महत्त्वाचा असतो, हे भावनिक शब्दांत सांगितलं. मागील वर्षभरापासून ‘आमने सामने’ नाटकाचे प्रयोग सातत्याने हाऊसफुल्ल जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. नाटक पाहताना प्रेक्षकांना जितका आनंद मिळतो, तितकीच मजा कलाकारांनाही प्रयोग करताना येते, असंही त्यांनी म्हटलं आहे.
लीना भागवत यांची पोस्ट-
‘मेरी आवाज ही पेहचान है.. आता पुढचे काही दिवस ‘कसं वाटलं नाटक?’ असं म्हणता येणार नाही. हेच कशाला काहीच बोलता येणार नाही. गेले काही दिवस फक्त एकच गाणं आठवतंय मेरी आवाज ही पेहचान है. एका कलाकारासाठी त्याचा आवाज हीच खरी त्याची ताकद असते. मागच्या वर्षीपासून आमने सामनेचे प्रयोग लागोपाठ हाऊसफुल जातायत. प्रयोग बघताना जेवढी मजा तुम्हाला येते तेवढीच आम्ही कलाकारसुद्धा करतो. आमने सामनेमधल्या माझ्या पात्राला दिलेलं प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. पण गेले काही महिने आवाजावर ताण यायला सुरुवात झाली होती,’ असं त्यांनी सांगितल.
या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ‘डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग करू लागले पण शेवटी डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली. पेहचान टिकवायची असेल तर एक छोटी प्रोसिजर करावीच लागेल. अखेर काल ती प्रोसिजर पार पडली. डॉक्टर त्यांची संपूर्ण टीम, मंगेश, नाटकाची टीम पूर्ण वेळ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आता काही दिवस आवाजाला विश्रांती देतेय. थोड्या दिवसांनी अजून ताकदीने उभी राहीन आणि पुन्हा म्हणेन ‘कसं वाटलं नाटक?’ तोपर्यंत एक छोटासा मध्यांतर.. लवकरच भेटू आमने सामने.’
लीना भागवत यांच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाविश्वातील कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. काळजी घे आणि छान बरी हो. आम्ही सगळे तुझे चाहते, तुझा आवाज ऐकायला आतुर आहोत. खूप प्रेम, असं अभिनेत्री मुक्ता बर्वेनं म्हटलंय. तर ‘लवकर बरी हो ताई. मला आई-बाबांना पाठवायचं आहे नाटक बघायला’, असं अमृता देशमुखने लिहिलं आहे. अभिनेता सुबोध भावेनंही ‘लीना पुन्हा नव्या जोमाने उभी राहशील, मोरया’ असं म्हणत धीर दिला.