यांनी आपला खोकलाही फेमस केला.. संकर्षण म्हणताच अशोक मामांनी सांगितला ‘वख्खा विख्खी वूक्खु’मागचा रंजक किस्सा
'कोण होणार करोडपती'च्या आगामी एपिसोडमध्ये अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे हॉटसीटवर बसणार आहेत. यावेळी अशोक सराफ आणि माधुरीने त्यांच्या सर्वाधिक गाजलेल्या डायलॉगचे किस्से सांगितले.

‘कोण होणार करोडपती’च्या आगामी विशेष भागात प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे. यावेळी माधुरी दीक्षितसमोर हॉट सीटवर बसणार आहेत अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे. यावेळी गप्पांच्या ओघात संकर्षण कऱ्हाडे यानं माधुरी दीक्षित आणि अशोक सराफ या दोघांमधील एक भन्नाट आणि अनोखा समान धागा शोधून काढला. संकर्षण म्हणाला की, “माझ्यासोबत आज अशा दोन व्यक्ती आहेत, ज्यांनी आपला खोकला देखील प्रसिद्ध केला आहे.” संकर्षणचा हा रोख माधुरी दीक्षितच्या ‘हम आपके है कौन’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘ऊहू ऊहू’ आणि अशोक सराफ यांच्या ‘धूमधडाका’ चित्रपटातील अजरामर ‘वख्खा विख्खी वूक्खु’ या संवादांकडे होता. संकर्षणने या दोन्ही आयकॉनिक खोकल्यांमागची नेमकी कथा विचारली असता, दोन्ही कलाकारांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
संकर्षणच्या प्रश्नाला उत्तर देताना माधुरी दीक्षितने ‘हम आपके है कौन’ चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा सांगितला. ती म्हणाली, “चित्रपटात एक असा सीन होता जिथे फोन उचलल्यावर समोरच्या व्यक्तीला न बोलता कळायला हवं की पलीकडे कोण आहे. यासाठी काहीतरी वेगळं आणि युनिक हवं होतं. त्यावर दिग्दर्शक आणि टीमनं बराच विचार केला. आम्ही वेगवेगळे आवाज काढून पाहिले आणि शेवटी हे ‘ऊहू ऊहू’ फायनल झालं.”
पहा व्हिडीओ
दुसरीकडे, अशोक सराफ यांनीही त्यांच्या गाजलेल्या ‘वख्खा विख्खी वूक्खु’ या संवादामागचे गुपित उघड केलं. अशोक मामांनी सांगितलं की, “त्या सीनमध्ये मला हातात पाईप घेऊन तो ओढायचा होता. त्या पाईपमुळे संवाद बोलताना मला खरोखरच जोरात खोकला आला. मात्र, मी तो सीन थांबवला नाही आणि त्याच खोकल्याच्या सुरात तो संवाद पुढे सुरू ठेवला.”
माधुरी दीक्षित आणि अशोक सराफ यांच्या या दिलखुलास गप्पा आणि जुन्या आठवणींमुळे ‘कोण होणार करोडपती’चा हा भाग प्रेक्षकांसाठी अत्यंत खास आणि मनोरंजक ठरणार यात शंका नाही. ‘कोण होणार करोडपती’चा हा एपिसोड प्रेक्षकांना 13 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर आणि सोनी लिव ॲपवर पहायला मिळेल.