Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा अहिराणी भाषेचा ठसका! शिक्षिकेची कौतुकाची थाप, ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर रंगली मायबोलीची चर्चा

Madhuri Dixit: कोण होणार करोडपतीचा हा विशेष भाग तुम्हाला शुक्रवारी रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर आणि सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहे.

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा अहिराणी भाषेचा ठसका! शिक्षिकेची कौतुकाची थाप, ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर रंगली मायबोलीची चर्चा
स्पर्धक वैशाली नांद्रे आणि माधुरी दीक्षित
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 20, 2026 | 8:11 AM

Madhuri Dixit: महाराष्ट्राच्या विविध भागांतील भाषा, बोली आणि संस्कृती यांचं वैविध्य आपल्या मायबोलीला अधिक समृद्ध करतं. खानदेशातील अहिराणी, बंजारा आणि मराठी अशा विविध भाषांच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या प्राथमिक शाळेच्या शिक्षिका वैशाली नांद्रे यांनी ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर अहिराणी भाषेत बोलण्याचा आग्रह करत माधुरी दीक्षितशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी माधुरीच्या व्यक्तिमत्त्वाचं, तिच्या अभिनयाचं, नृत्याचं आणि सर्वसामान्य स्पर्धकांशी संवाद साधण्याच्या तिच्या सहज स्वभावाचं वैशाली यांनी भरभरून कौतुक केलं. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असलेल्या वैशाली नांद्रे यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या भाषिक वैविध्याविषयी सांगताना खानदेशातील अहिराणी भाषेचा उल्लेख केला. ‘आमच्या खानदेशात अहिराणी भाषा प्रामुख्याने बोलली जाते. तिचा लहेजा वेगळाच आहे. माझ्या विद्यार्थ्यांशी अहिराणी भाषेत बोला ना’, अशी प्रेमळ विनंती त्यांनी माधुरीला केली.

वैशाली यांच्या विनंतीला प्रतिसाद देत माधुरीनं अहिराणी भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला आणि ‘शिकीन, चांगलं मोठ्ठ माणूस बना’, असं म्हणत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माधुरीच्या तोंडून अहिराणी ऐकून आनंदित झालेल्या वैशाली म्हणाल्या, ‘आमची अहिराणी आपल्या तोंडून छान वाटते.’ माधुरीचं कौतुक करताना वैशाली पुढे म्हणाल्या, ‘हा खेळ बदललाय असं आपण म्हणतोय, तर एक स्त्री होस्ट होऊ शकते आणि इतक्या सुंदर पद्धतीनं हा खेळ पुढे नेऊ शकते, याचा तुमच्याविषयी अभिमान आहे. तुमच्यातला कसदार अभिनय, बहारदार नृत्य आणि जन्मजात सौंदर्य यांचा मिलाफ तुम्हाला तुमच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर घेऊन गेला आहे. एक महाराष्ट्रीय मुलगी आपला प्रवास इतक्या सुंदरपणे करते आणि आदर्श मुलगी, आदर्श आई आणि आदर्श अभिनेत्री होऊ शकते, याचं तुम्ही मूर्तिमंत उदाहरण आहात.’

Loading...

या कौतुकाला उत्तर देताना माधुरीनंही नम्रतेनं स्पर्धकांच्या आयुष्यातून मिळणाऱ्या प्रेरणेचा उल्लेख केला, माधुरी म्हणाली, ‘मलाही तुमच्या सगळ्यांच्या प्रवासातून प्रेरणा मिळते. इथं जे स्पर्धक येतात, माझ्याशी बोलतात, त्यांचं जीवन जेव्हा मला कळतं, त्यांनी काय संघर्ष केले आहेत, त्यातून मी प्रेरित होते. तुमच्यामुळे मी आहे’, असं माधुरी म्हणाली. माधुरीच्या या उत्तरावर वैशाली यांनी तिच्या मनाचा मोठेपणा अधोरेखित केला. ‘हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही उत्तम स्त्री आहातच; पण सामान्य व्यक्तींशी तुम्ही जसा संवाद साधता, तो मनाला इतका भावतो. आमच्या धुळ्यातलेही स्पर्धक इथं येऊन गेले आहेत. प्रत्येक सामान्य स्पर्धकाच्या जवळ जाऊन त्याला समजून घेणं, प्रत्येक स्त्रीला समजून घेणं, प्रत्येकाचं वेगळं क्षेत्र असूनही त्याविषयी इतक्या छान पद्धतीनं जाणून घेणं, हे तुमच्या स्वभावातला एक सुंदर पैलू आहे. या शोच्या निमित्तानं तो आम्हाला अनुभवायला मिळतो’, असं वैशाली म्हणाल्या.

भाषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी नातं जोडणाऱ्या शिक्षिका वैशाली नांद्रे यांच्या या संवादातून ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर केवळ ज्ञान आणि मनोरंजनच नव्हे, तर प्रादेशिक भाषांचा अभिमान आणि माणसांमधील आपुलकीही अनुभवायला मिळाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us