गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो.. सांगून प्रसिद्ध अभिनेत्याची कोट्यवधींची फसवणूक; पाच जणांनी घातला गंडा
गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो.. असं आश्वासन देऊन 'महाभारत' फेम अभिनेत्याची कोट्यवधी रुपयांची फसणवूक करण्यात आली आहे. आयुष शाह असं या अभिनेत्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

गुंतवणुकीवर चांगला आणि खात्रीशीर परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका अभिनेत्याची तब्बल 4 कोटी 44 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. अभिनेता आयुष शाहला विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून ही रक्कम उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिश्वजित बादलचंद्र घोष, पियाली चॅटर्जी, बिज्योया दास, शाबाब हुसैन आणि बादलचंद्र घोष अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी आयुष शाहचा विश्वास संपादन करून त्यांना विविध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. यामध्ये फ्लेज इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटीसह इतर कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला आर्थिक फायदा होईल, तसंच गुंतवलेल्या रकमेवर खात्रीशीर परतावा मिळेल, असं आश्वासन आरोपींकडून देण्यात आल्याचा आरोप आहे.
आयुष शाहचा विश्वास बसावा आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवावेत, यासाठी आरोपींनी कथितपणे बनावट बँक स्टेटमेंटचा वापर केला. गुंतवणुकीवर परतावा मिळत असल्याचं भासवण्यासाठी त्यांना बनावट बँक स्टेटमेंट पाठवण्यात आले. या कागदपत्रांमुळे दिशाभूल झाल्याचा आरोप असून, त्यानंतर अभिनेत्याला कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. अशा प्रकारे एकूण 4 कोटी 44 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये कलम ३१६(२), ३१८(२), ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ६१(१) आणि ३(५) यांचा समावेश आहे. या कलमांमध्ये विश्वासघात, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि त्यांचा वापर करणे यांसारख्या आरोपांशी संबंधित तरतुदींचा समावेश आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास केला जाणार आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली नेमकी किती रक्कम कोणत्या कंपनीत वळवण्यात आली, बनावट बँक स्टेटमेंट कोणी तयार केले आणि या कथित फसवणुकीत प्रत्येक आरोपीची भूमिका काय होती, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच संबंधित कंपन्यांचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, हेही तपासातून स्पष्ट होईल. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.