महेश मांजरेकरांना जीवनगौरव,तर मुक्ता बर्वे ते अनुपम खेर यांना विशेष पुरस्कार जाहीर; आशिष शेलारांची घोषणा

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने 2024 आणि 2025 साठी विविध प्रतिष्ठित पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हे पुरस्कार 25 एप्रिल 2025 रोजी प्रदान केले जाणार आहेत. मराठी- हिंदीचित्रपट सृष्टीतील कलाकारांना पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहे.

महेश मांजरेकरांना जीवनगौरव,तर मुक्ता बर्वे ते अनुपम खेर यांना विशेष पुरस्कार जाहीर; आशिष शेलारांची घोषणा
Maharashtra Govt Announces Lata Mangeshkar, V. Shantaram Awards 2024
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 17, 2025 | 4:45 PM

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, व्ही.शांताराम जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली आहे. कोणाला कोणते पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात.

कोणाला कोणता पुरस्कार?
संगीत क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा 2025 सालाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मराठीतील जेष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 2024 सालाचा चित्रपती कै.व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने महेश मांजरेकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर, चित्रपती कै.व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मुक्ता बर्वेला देण्यात येणार आहे. तर स्व.राजकपूर जीवन गौरव पुरस्कार अनुपम खेर यांना जाहीर करण्यात आला आहे. या नावांची आणि पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केली आहे. या पुरस्कारांचे वितरण येत्या 25 एप्रिल 2025 रोजी होणार आहे.

पुरस्काराचे स्वरुप कसं असणार 

‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’
या सर्व कलाकारांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे स्वरुप नक्की कसे असणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जेष्ठ कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे रोख रक्कम दहा लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र आणि शाल. लता मंगेशकर पुरस्कार्थिची निवड करण्याकरता शासन स्तरावर एका समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्य मंत्री असून यामध्ये पाच अशासकीय सदस्य आहेत. पं ब्रिजनारायण, अशोक पत्की, सत्यशील देशपांडे, पं उल्हास कशाळकर आणि अंबरीश मिश्र यांचा या समितीमध्ये समावेश होता.

‘चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार’

मराठी चित्रपट क्षेत्रात अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा कलाकारांना चित्रपती. व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. तसेच या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरास चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. 2024 सालाचा चित्रपती कै.व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार श्री. महेश मांजरेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुर असणार आहे 10 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र तसचे चांदीचे मेडल.

‘चित्रपती कै.व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार’

2024 सालाचा चित्रपती कै.व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मुक्ता बर्वेला जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरुप असणार आहे 6 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र , चांदीचे मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार’

हिंदी चित्रपट क्षेत्रात अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा मान्यवरास स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरास स्व. राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. 2024चा स्व.राजकपूर जीवन गौरव पुरस्कार अनुपम खेर यांना जाहीर करण्यात येत आहे. या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे 10 लक्ष, स्मृतिचिन्ह व मानपत्र , चांदीचे मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.