Prasad Khandekar : अंडर-14 मध्ये निवड झालेली…क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न ‘त्या’ घटनेनं मोडलं, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्यानं सांगितलेला प्रसंग

Maharashtrachi Hasyajatra Fame Actor : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं त्याच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला होता. अभिनेत्याला क्रिकेटपटू व्हायचं होतं.

Prasad Khandekar : अंडर-14 मध्ये निवड झालेली...क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न त्या घटनेनं मोडलं, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्यानं सांगितलेला प्रसंग
| Updated on: Nov 28, 2026 | 9:12 PM

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर. आपल्या विनोदी अभिनयशैलीनं आणि भन्नाट विनोदांनी त्यानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. अभिनयासोबतच प्रसाद उत्तम लेखक आणि दिग्दर्शकही आहे. मात्र, आज यशाच्या शिखरावर असलेल्या प्रसादचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याला लहानपणापासून क्रिकेटपटू व्हायचं होतं. मुंबईच्या अंडर-14 क्रिकेट संघात त्याची निवडही झाली होती. पण एका मोठ्या अपघातानं त्याचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं आणि त्याच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं.

क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न, पण अपघातानं बदललं आयुष्य

Loading...

प्रसाद खांडेकरनं एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील या कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला की, ‘खरं तर मी क्रिकेटपटू होतो. मुंबईमधून अंडर-14 साठी माझी निवड झाली होती. इयत्ता दहावीनंतर माझा एक मोठा अपघात झाला. त्यानंतर सगळंच थांबलं. जवळपास तीन महिने केईएम रुग्णालयामध्ये माझ्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर माझ्या आयुष्याला बरंच वळण मिळालं.’ क्रिकेटमध्ये करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रसादला या अपघातामुळे खेळापासून दूर व्हावं लागलं. मात्र, त्यानंतर त्यानं हार मानली नाही. आयुष्यात आलेल्या या अनपेक्षित वळणानंतर त्यानं स्वतःसाठी अभिनयाचं नवं क्षेत्र निवडलं.

प्रसादचे वडील नाटकाचे मोठे चाहते होते. ते अनेकदा प्रसादला सोबत घेऊन नाटक पाहायला जायचे. त्यामुळे लहानपणापासूनच त्याला नाटकांची आणि अभिनयाची आवड निर्माण झाली होती. अपघातानंतर त्यानं वडिलांसोबत भरत जाधव यांचं ‘श्रीमंत दामोदर पंत’ हे नाटक पाहिलं. हे नाटक पाहिल्यानंतर त्याला अभिनय क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. याबद्दल बोलताना प्रसाद म्हणाला होता, ‘त्यावेळी मला असं वाटलं की, हे क्रिकेटसारखंच आहे. इथे तुम्ही करत असलेल्या कामाची तुम्हाला समोरासमोर पोचपावती मिळते.’ प्रेक्षकांकडून मिळणारी दाद आणि टाळ्यांचा आवाज यामुळे त्याला अभिनय क्षेत्राकडे वळण्याची इच्छा झाली.

 

प्रसाद खांडेकर कांदिवलीतील ठाकूर महाविद्यालयात शिकत होता. मात्र, तिथे मराठी मुलांची संख्या कमी होती आणि एकांकिका किंवा मराठी नाटकांसाठी फारसं व्यासपीठ नव्हतं. त्यामुळे त्यानं स्वतः पुढाकार घेतला. त्यानं 10 ते 15 मुलांना एकत्र आणलं आणि ‘मराठी कलामंच’ नावाचा ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून तो एकांकिका करू लागला. इथूनच त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. पुढे ‘आम्ही पाचपुते’ हे त्याचं पहिलं व्यावसायिक नाटक ठरलं. त्यानंतर त्यानं अनेक नाटकांमध्ये काम केलं. अभिनयासोबतच लेखनाची आवड जोपासत त्यानं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे मिळाली घराघरांत ओळख

प्रसादच्या कारकिर्दीला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे मोठं वळण मिळालं. या कार्यक्रमातील त्याच्या विविध विनोदी भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नम्रता संभेरावसोबतची त्याची जोडीही विशेष लोकप्रिय झाली.अभिनयासोबतच त्यानं लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं. ‘कुर्रर्रर्र’ या विनोदी नाटकातूनही त्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता प्रसादचं ‘थेट तुमच्या घरातून‘ हे नाटकही रंगभूमीवर प्रचंड गाजतंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us