करिअरच्या सुरुवातीचा काळ, महेश कोठारेंच्या सिनेमात साकारली भूमिका; आज गाजवतोय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकारनं महेश कोठारे यांच्या 'माझा छकुला' या सिनेमात भूमिका साकारली होती.

करिअरच्या सुरुवातीचा काळ, महेश कोठारेंच्या सिनेमात साकारली भूमिका; आज गाजवतोय महाराष्ट्राची हास्यजत्रा
| Updated on: Nov 06, 2026 | 8:37 PM

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. या कार्यक्रमातील कलाकारांच्या विनोदांइतकीच त्यामागे काम करणाऱ्या लेखक-दिग्दर्शकांचीही चर्चा होत असते. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे त्यापैकीच एक लोकप्रिय नाव आहे. मात्र, सचिन गोस्वामी यांनी केवळ लेखन आणि दिग्दर्शनच नाही, तर अभिनयही केला आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या ‘माझा छकुला’ या चित्रपटात त्यांनी एक छोटीशी, पण लक्षवेधी भूमिका साकारली होती.

महेश कोठारे दिग्दर्शित ‘माझा छकुला’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटात निवेदिता सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, विजय चव्हाण आणि बालकलाकार आदिनाथ कोठारे यांसारखे कलाकार झळकले होते. चित्रपटातील आदिनाथच्या भूमिकेचंही विशेष कौतुक झालं होतं. या चित्रपटात सचिन गोस्वामी यांनी हमालाची भूमिका साकारली होती. निवेदिता सराफ यांचं सामान घेऊन येणारा आणि त्यांच्याशी वाद घालणारा हमाल प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. त्या वेळी कदाचित अनेकांनी या कलाकाराकडे फारसं लक्ष दिलं नसेल. मात्र, आज ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे घराघरांत पोहोचलेल्या सचिन गोस्वामी यांना पडद्यावर पाहणं चाहत्यांसाठी नक्कीच आश्चर्याची बाब आहे.

Loading...

काय म्हणाले सचिन गोस्वामी?

नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सचिन गोस्वामी यांनी ‘माझा छकुला’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल आठवणी सांगितल्या. सचिन गोस्वामी म्हणाले की, ”कल्पना एक अविष्कार अनेक’ या स्पर्धेत अनेकांना कला सादर करायची संधी मिळायची. त्या स्पर्धेत मी एक एकांकिका बसवली होती. त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक हे दोन्ही पुरस्कार मला मिळाले. ही एकांकिका खूप गाजली होती. त्यावेळी एक्सप्लोजर खूप कमी होतं. टेलिव्हिजनही एवढं नव्हतं. त्या स्पर्धेला खूप मोठी मंडळी यायची. तिथे आम्ही एक स्किटही सादर केलं होतं. संजय पवार, चंदू कुलकर्णी, आनंद इंगळे, पूजा पवार आणि मी असे कलाकार होतो.’

‘ते स्किटही प्रचंड गाजलं. तिथून मग काही सिनेमाच्या ऑफर मिळाल्या. महेश कोठारे कुटुंबीयांसोबत तिथे आले होते. त्यावेळी महेशजींनी एका सिनेमाची घोषणा केली होती. ‘गेलो उडत’ असं सिनेमाचं नाव होतं. त्यामध्ये ६ हिरोंपैकी मी एक होतो. पण, तो सिनेमा झाला नाही. ‘माझा छकुला’ सिनेमाच्या शूटिंगवेळी त्यांनी मला निरोप पाठवला की, छोटासा रोल आहे. फार काही नाहीये. तुला आवडेल का? त्या सिनेमात हमालाचा रोल होता. करिअरच्या सुरुवातीचा काळ असल्याने मी तो रोल केला. तेव्हा मला कुणी ओळखतंही नव्हतं, त्यामुळे एडिटरही महेशजींना म्हणाले होते की, आजकाल हमालही चांगलं काम करतात. तेव्हा महेशजी त्यांना म्हणाले की अरे तो अभिनेता आहे.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us