
मराठी मनोरंजन विश्वात सध्या आनंदाच्या बातम्या एकामागून एक येत आहेत. लग्नांचा हंगाम सुरू असतानाच काही कलाकार आपल्या आयुष्यात मोठ्या गोष्टी करताना दिसत आहेत. अशाच एका अभिनेत्रीने स्वतःच्या मेहनतीने नवे घर खरेदी केले आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेली वनिता खरात. वनिता सुरुवातीला 10 बाय 10च्या खोलीत राहात होती. आज तिने तिचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिने हायफाय टॉवरमध्ये 23व्या मजल्यावर घर घेतले आहे.
वनिताने शेअर केला व्हिडीओ
काही दिवसांपूर्वी वनिता खरातने आपण नवे घर घेतल्याची आनंदवार्ता चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता मात्र तिने त्या नव्या घरात अधिकृत एन्ट्री केली आहे आणि त्याची सुंदर झलक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. हक्काच्या माणसांसह हक्काच्या घरात पाऊल ठेवतानाचा हा क्षण वनितासाठी खास होता. या खास प्रसंगी वनिताचे पूर्ण कुटुंबीय तिच्या सोबत होते. शिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील तिचे सहकलाकारही तिच्या आनंदात सहभागी झाले होते. नम्रता संभेराव, रोहित माने यांसारखे कलाकार तिला शुभेच्छा देण्यासाठी हजर होते.
वाचा: कधीकाळी मुंबईचा डॉन, त्याचीच सुंदर मुलगी आता मागतेय भीक, त्या राजकुमारीवर अशी वेळ का आली?
चाहत्यांनी केले कौतुक
समोर आलेल्या व्हिडीओत वनिता नव्या घरात प्रवेश करताना दिसते. घरात आल्यावर तिने पती सुमितसोबत छोटीशी पूजा केली. त्यानंतर पारंपरिक विधी पूर्ण करून सर्वांनी मिळून फोटोशूट केले. घराची रचना आणि डेकोरेशनची पहिली झलक यातून दिसते. विशेष म्हणजे, घराच्या गॅलरीतून (बाल्कनीतून) २३व्या मजल्यावरून शहराचा अप्रतिम देखावा दिसतो आहे. किचन आणि हॉलची रचना देखील आकर्षक वाटते.
आता घर पूर्णपणे सजल्यानंतर ते कसे दिसेल, वनिता त्याला कशी सजवेल, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. वनिताचा हा व्हिडीओ पाहिल्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आणि कौतुक केले जात आहे. पूर्वी १० बाय १० च्या छोट्याशा खोलीत राहणाऱ्या वनिताने मेहनतीने आणि चिकाटीने हे यश मिळवले आहे. तिची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आता वनिता या नव्या घराचे नवे फोटो कधी शेअर करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.