ओंकार भोजने गाजवणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’चं नवीन सिझन; स्किट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा लोकप्रिय मराठी कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'चा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 5 जानेवारीपासून हा शो सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

ओंकार भोजने गाजवणार महाराष्ट्राची हास्यजत्रेचं नवीन सिझन; स्किट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक
महाराष्ट्राची हास्यजत्रा
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 04, 2026 | 1:42 PM

‘कोकणचा कोहीनूर’ म्हणून ओळखला जाणारा विनोदवीर ओंकार भोजने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’च्या नवीन सिझनमधून दमदार कमबॅक करतोय.  महाराष्ट्रभर प्रचंड लोकप्रिय असलेल्या या शोचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या शोचा नवीन सीझन 5 जानेवारीपासून दर सोमवार आणि मंगळवार रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या सिझनचं वैशिष्ट्य ओंकार भोजने ठरणार आहे. कारण काही कारणास्तव त्याने हा शो सोडला होता. आता नव्या सिझनमध्ये त्याचं दमदार परफॉर्मन्स पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं होतं. समीर, प्रसाद, नम्रता, गौरव, वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी पोट धरून हसवलं होतं. लॉकडाऊनच्या कठीण काळातही हा कार्यक्रम रसिकांचं मनोरंजन करत होता. जवळपास साडेतीन वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या कार्यक्रमाने काही काळासाठी ब्रेक घेतला होता.

या सिझनमध्ये नव्या संकल्पनेवर आधारित नवे स्किट्स, नवीन व्यक्तिरेखा आणि खास नवीन ट्विस्ट पहायला मिळणार आहेत. त्यासोबतच प्रेक्षकांच्या मनात घर केलेली मराठमोळी विनोदाची शैली, नवे विषय आणि नव्या प्रहसनासह हा सिझन आणखी भव्य, रंगतदार आणि मनोरंजक ठरेल अशी खात्री व्यक्त केली जात आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. दिवसातील सगळी धावपळ, ताणतणाव विसरून लोक या शोसोबत मनमुराद हसतात. त्यामुळेच नवीन वर्षात शोच्या पुनरागमनाची घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण आहे.

रविवारची हास्यजत्रा झाल्यावर प्रेक्षकांनी चार दिवस हास्यजत्रेची मागणी केली होती. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हे विनोदवीर आठवड्यातून पाच दिवस यायला सज्ज झाले होते. परंतु यामुळे कामात तोच-तोचपणा येऊन दबाव निर्माण झाला होता. म्हणूनच काही काळ क्रिएटिव्ह ब्रेकची गरज भासल्याने या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.

़नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात आणि नवीन उत्साह. याच उत्साहाला सलाम करत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा नवा सिझन प्रेक्षकांसमोर येत आहे. या कार्यक्रमाचा प्रयत्न नेहमीच कुटुंबांना एकत्र आणणं, हास्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा आहे. नवीन सिझन प्रेक्षकांना दुप्पट मजा आणि दुप्पट एंटरटेनमेंट देईल, असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केला आहे. येत्या 5 जानेवारीपासून दर सोमवारी आणि मंगळवार रात्री 9 वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम फक्त सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.