
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात प्रेक्षकांना नेहमीच नवनवीन गोष्टी पहायला मिळतात. या गोष्टी प्रेक्षकांच्याही पसंतीस पडतात. नुकतंच नागपूरमध्ये पार पडलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’ कार्यक्रमात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. नागपूरकरांची तुफान उपस्थिती पहायला मिळाली. नागपूरकरांच्या विशेष उपस्थितीने हा कार्यक्रम विशेष रंगला आणि हाच धमाल कार्यक्रम आता संपूर्ण महाराष्ट्रातील आणि जगभरातील प्रेक्षकांना त्यांच्या घरबसल्या अनुभवता येणार आहे. हा विशेष भाग येत्या शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होईल.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील उपस्थिती होती. या विशेष भागात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘चे लाडके कलाकार समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, वनिता खरात, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, ओंकार राऊत, आणि प्रभाकर मोरे यांच्यासह इतर विनोदवीर त्यांच्या नेहमीच्या शैलीत प्रहसने सादर करतील. नागपूरच्या मंचावर सादर झालेले हे खास स्किटस् आणि कलाकारांची विनोदी जुगलबंदी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावेल, यात शंका नाही. कार्यक्रमाचे परीक्षक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर, तसंच सूत्रसंचालक प्राजक्ता माळीचीही विशेष उपस्थिती या भागात पाहायला मिळाली.
या कार्यक्रमाबद्दल नितीन गडकरी म्हणाले, “महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम नेहमी पाहतो आणि हा कार्यक्रम मला फार आवडतो. मी दिल्ली आणि मुंबई दोन्हीकडे हा कार्यक्रम आवर्जून पाहतो. कारण या कार्यक्रमातून विनोदाचा आनंद मिळतो आणि कार्यक्रम पाहून माणूस टेन्शन फ्री देखील होतो.”
या कार्यक्रमात विशेषतः प्राजक्ता माळी आणि सई ताम्हणकर यांची जोडी मंचावर अवतरताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सईने वऱ्हाडी भाषेत बोलायला सुरुवात करत नागपूरकरांचं मन जिंकलं. सई आणि प्रेक्षकांचं वऱ्हाडी भाषेतील संभाषण नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. तसंच प्रसाद ओकने नितीन गडकरी यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तीन तासांच्या या कार्यक्रमात नवनवीन प्रहसने प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यासोबतच विविध गाणी देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी असणार आहेत.