
मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या नावावरून मोठा वाद झाला. चित्रपटाच्या या नावामुळे भावना दुखावल्याची तक्रार काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली. त्यानंतर पुणे, छत्रपती संभाजीनगर इथल्या थिएटरमधील या चित्रपटाचे शोज थांबवण्यात आले. मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी मृण्मयीची साथ देत या वादाला विरोध केला होता. परंतु मृण्मयीने लगेच माघार घेत अखेर चित्रपटाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘मनाचे श्लोक’ हा चित्रपट आता ‘तू बोल ना’ या नवीन नावाने थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या वादावर आता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटाचं नाव बदलायचं नव्हतं, असं मत त्यांनी मांडलंय.
“त्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी बरेच कलाकार पुढे आले. पण त्यांनी अवघ्या तासाभरात चित्रपटाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. ते का नाही थांबले? मी ‘शिक्षणाच्या आयचा घो’ चित्रपटाच्या वेळी शेवटपर्यंत थांबलो होतो. मी अजिबात नाव बदलणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. कारण यामुळे समोरच्यांना आणखी प्रोत्साहन मिळतं की आपण यांच्यावर परत हल्ला केला की हे परत नाव बदलतील. ‘शिक्षणाच्या आयचा घो’ ही काही शिवी नव्हती. आयचा घो म्हणजे कोकणात ‘आईचा नवरा’. ही शिवी आहे असं काहींना वाटलं होतं. परंतु त्याने कुणाच्या भावना वगैरे दुखावल्या नव्हत्या आणि भावना दुखावणारं नाव मी ठेवतही नाही. तसंच ‘मनाचे श्लोक’ ही एक मनवा आणि श्लोक यांची गोष्ट होती. त्यांनी त्यावर ठाम राहायला पाहिजे होतं. जर सेन्सॉर बोर्डाने पास केलंय, तर कोणीही त्यावर आक्षेप घेऊ नये, असं माझं ठाम मत आहे. पण तुम्हीसुद्धा त्यावर ठाम राहा”, असं स्पष्ट मत महेश मांजरेकरांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं.
सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिल्यानंतरही काही संघटनांच्या वतीने चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. या सगळ्या गोंधळानंतर निर्मात्यांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, थिएटर्स आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ नये, यासाठी मृण्मयीने नव्या नावासह चित्रपट पुन्हा सादर करण्याचा निर्णय घेतला.
या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब अशी तरुणांची तगडी फळी झळकणार आहे. तसंच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.