ब्रेकअपनंतर अर्जुन-मलायका पहिल्यांदाच एकमेकांसमोर; अभिनेत्याची ‘ही’ कृती ठरतेय कौतुकास्पद

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनलाही ती गैरहजर राहिली. इतकंच नव्हे तर तिने त्याच्यासाठी वाढदिवसाची पोस्टसुद्धा लिहिली नाही. अर्जुन आणि मलायका हे त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मात्र अप्रत्यक्षपणे टोमणे मारताना दिसत आहेत.

ब्रेकअपनंतर अर्जुन-मलायका पहिल्यांदाच एकमेकांसमोर; अभिनेत्याची ही कृती ठरतेय कौतुकास्पद
Arjun Kapoor and Malaika Arora
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 27, 2024 | 10:55 AM

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान दोघं सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे एकमेकांसाठी पोस्ट लिहित होते. मात्र दोघांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. आता या चर्चांदरम्यान पहिल्यांदाच अर्जुन आणि मलायका हे एका कार्यक्रमात एकमेकांसमोर आले. या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अर्जुन आणि मलायकाने ‘इंडिया काऊचर वीक 2024’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. नवी दिल्लीत शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला होता. सर्वांत आधी हे दोघं एकमेकांपासून दूर वेगवेगळ्या खुर्च्यांवर बसलेले दिसले. त्यानंतर एका व्हिडीओमध्ये अर्जुनने गर्दीतून मलायकाला वाट करून दिल्याचं पहायला मिळालं. या दोन्ही व्हिडीओंवर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

पहिल्या व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुन हे दोघं पहिल्या रांगेत बसलेले दिसत आहेत. मात्र हे दोघं एकमेकांच्या बाजूला नव्हे तर एकमेकांपासून दूर बसले होते. याच व्हिडीओच्या दुसऱ्या भागात अर्जुनभोवती चाहत्यांचा घोळका पहायला मिळतोय. त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेकांनी तिथे गर्दी होती. त्याच ठिकाणी मलायका येते आणि चाहत्यांच्या गर्दीतून पुढे जाण्यासाठी अर्जुन तिला वाट मोकळी करून देतो. यावेळी मलायकाने पांढऱ्या रंगाचा ब्लेझर को-ऑर्ड सेट परिधान केला होता. तर अर्जुनने ब्लॅक सिक्वीन शेरवानी आणि धोती सेट घातला होता. मलायका आणि अभिनेता राहुल खन्ना हे या फॅशन शोमध्ये डिझायनर सिद्धार्थ टिटलरसाठी शो स्टॉपर ठरले होते.

या वर्षी मे महिन्यापासून अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. 2018 मध्ये मलायका आणि अर्जुनने सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर दोघांना विविध ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं. इतकंच नव्हे तर त्यांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मलायकाने याआधी सलमान खानचा भाऊ अरबाज खानशी लग्न केलं होतं. 2017 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांना 21 वर्षांचा अरहान हा मुलगा आहे.