इराणींना फाशी दिली, तेव्हा कुठे होता? बोमन इराणींवर भडकली अभिनेत्री; नेमकं काय घडलं?

एलपीजी सिलिंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेते बोमन इराणी यांनी इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली होती. आता एका अभिनेत्रीने त्यांना फटकारलं आहे.

इराणींना फाशी दिली, तेव्हा कुठे होता? बोमन इराणींवर भडकली अभिनेत्री; नेमकं काय घडलं?
Mandana Karimi, Donald Trump and Boman Irani
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 27, 2026 | 12:32 PM

इराणच्या तेहरानमध्ये जन्मलेली अभिनेत्री आणि मॉडेल मंदाना करीमी ही पश्चिम आशियात सुरु असलेल्या संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त होत आहे. नुकतंच अभिनेते बोमन इराणी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलचा एक विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ट्रम्प यांनी इराणशी शांततापूर्ण संवाद साधण्याची इच्छा व्यक्ती केली होती. त्यावरून हा मजेशीर व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला होता. या व्हिडीओवरून आता मंदानाने बोमन इराणी यांना सुनावलं आहे. पारशी असून इराणींच्या मुद्द्यावर याआधी आवाज का उठवला नाही, असा सवाल तिने केला आहे.

बोमन इराणींच्या व्हिडीओवर कमेंट करत मंदाना करीमीने लिहिलं, ‘बोमन इराणी महोदय.. अचानक तुम्ही इराणबद्दल इतकं काही बोलू लागला आहात. वेळसुद्धा विचित्र आहे. अनेक वर्षांपासून इराणींना अटक केली जात आहे, फाशी दिली जात आहे, त्यांना गप्प केलं जातंय, हजारो लोक मारले गेले, कुटुंबं उद्ध्वस्त झाली आणि आपल्यासारख्या लोकांनी हे दु:ख सहन केलंय. आपण याबद्दल बोललो आहोत. परंतु आता.. एक व्हिडीओ समोर आला आहे. आता गॅस, ट्रम्प आणि माझ्या घरी या.. यांसारख्या मुद्द्यांवर खिल्ली उडवली जातेय.’

‘तुम्ही आणि पारशी समुदाय हा इराणचा आहे. तुम्ही त्या इतिहासाला आपल्यासोबत घेऊन फिरता. त्या अग्निला.. मग जेव्हा इराणी मरत होते, तेव्हा हा आवाज कुठे होता? आणि आता अचानक हे सर्व गॅस, राजकारण, वैश्विक मुद्द्यांना प्रभावित करतंय, त्यामुळे बोललं जातंय. मौनापासून उपहासापर्यंत.. हे तर खूपच लवकर घडलं. असो’, अशा शब्दांत तिने टोला लगावला आहे.

मंदाना करीमीच्या या टिप्पणीवर बोमन इराणी यांनी काही उत्तर दिलं नाही. मात्र नेटकऱ्यांनी तिला प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘डार्लिंग, हा फक्त उपहास होता’, असं एकाने म्हटलंय. तर ‘ही किती विचित्र गोष्ट आहे की जे लोक अनेक वर्षांपासून इराणमध्ये राहत नाहीयेत, ते अचानक सत्ता परिवर्तनाचे विशेषज्ज्ञ बनून अमेरिका-इस्रायलच्या वक्तव्यांशी सहमत होतात’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. काहींनी मंदानालाही ट्रोल केलं आहे.

बोमन इराणी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत ट्रम्प यांची खिल्ली उडवली होती. या व्हिडीओत ते म्हणाले, “तुम्हाला माहीत असेलच की डोनाल्ड ट्रम्प यांना इराणी लोकांशी बोलायचं आहे. त्यासाठी तीन जणांना आमंत्रित करण्यात आलं आहे. स्मृती इराणी, अरुणा इराणी आणि मी.. बोमन इराणी. मी तर तयार आहे. शांततेसाठी मी काहीही करायला तयार आहे. पण जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टनहून सोबत मोठा गॅस सिलिंडर घेऊन आले तर मी त्यांना विशेषत: एलपीजीचं संकट लक्षात घेऊन दादर परसी कॉलनीतील माझ्या घरी धनसक, कस्टर्ड आणि पारशी व्यंजनांचं भोजन खाऊ घालेन. “

Follow Us