‘मन धावतंया’ फेम राधिका भिडेला मिळाली मोठी ऑफर; रेणुका शहाणेंच्या चित्रपटात केलं पार्श्वगायन

'मन धावतंया तुझ्याच मागं' या गाण्यामुळे रातोरात प्रकाशझोतात आलेल्या राधिका भिडेला मोठी ऑफर मिळाली आहे. रेणुका शहाणेंच्या आगामी चित्रपटासाठी तिने एक गाणं गायलं आहे. 'उत्तर' या चित्रपटातील तिचं 'हो आई' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

मन धावतंया फेम राधिका भिडेला मिळाली मोठी ऑफर; रेणुका शहाणेंच्या चित्रपटात केलं पार्श्वगायन
Radhika Bhide
Image Credit source: Instagram
Updated on: Nov 19, 2025 | 9:32 AM

सध्या भारतभर गाजणारा , तरूणाईचा लाडका मराठमोळा आवाज म्हणजे ‘मन धावतंया’ फेम राधिका भिडेचा! याच राधिकाने गायलेलं पहिलंवहिलं मराठी चित्रपट गीत ‘हो आई’ सध्या चांगलंच व्हायरल होतंय. ‘उत्तर ‘ या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाच्या या प्रमोशन गाण्यात आई-मुलाच्या नात्यातील सुंदर केमिस्ट्री, गोड आपुलकी आणि ‘तू आहेस म्हणून मी आहे’ ही भावना सोप्या शब्दात आणि गोड चालीत उलगडली आहे. ‘उत्तर’ चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असतानाच ‘हो आई’ हे गाणं ती आतुरता अधिकच वाढवणारं आहे.

या गाण्याचे बोल सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांचे असून यापूर्वी अमितराज–क्षितिज पटवर्धन ह्या जोडीने ‘मन धागा धागा जोडते नवा’, ‘माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं’ आणि ‘तुला जपणार आहे’ यांसारख्या सुपरहिट गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं आहे. नात्यांचे बंध उलगडणारं, त्यांचं हळूवारपण जपणारं , अमितराज- क्षितिज पटवर्धन या जोडीचं ‘हो आई!’ हे नवं गाणं ‘उत्तर’ या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आपल्या सर्वांच्याच मनातली आईबद्दलची भावना व्यक्त करणारं राधिकाच्या सुमधुर सुरांनी सजलेलं तरल आणि संवेदनशील असं हे गाणं प्रत्येकाला आपल्या आईला ‘थँक यू’ म्हणण्याची संधी देणारं निश्चितच आहे.

झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या ‘उत्तर’या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर आणि जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या 12 डिसेंबरला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘आयपॉपस्टार’ या शोद्वारे राधिका सर्वांची मनं जिंकतेय. अत्यंत कमी वयात ती स्वत: गाणी लिहिते, त्यांना संगीतबद्ध करते आणि गातेसुद्धा. राधिकाची ही प्रतिभा पाहून शोमधील परीक्षकसुद्धा अवाक् झाले होते. ‘मन धावतंया’ या गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. परीक्षकांसमोर हे गाणं सादर केल्यानंतर सोशल मीडियावर ते तुफान व्हायरल होत आहे.