Sushant Singh Rajput | सुशांतचं नेमकं कुठे चुकलं? इंडस्ट्रीतील गटबाजी, राजकारणाबाबत मनोज बाजपेयींचं मोठं वक्तव्य

| Updated on: May 23, 2023 | 3:12 PM

इंडस्ट्रीत घराणेशाही नेहमीच असते, असं ते म्हणाले. त्याचसोबत त्यांनी इंडस्ट्रीबाहेरून येणाऱ्या कलाकारांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. "जर तुम्ही या फिल्मी जगात बाहेरून येत असाल तर नेपोटिझ्मला मनावर घेऊ नका. त्यापेक्षा तुमची ऊर्जा तुमच्या कलेत वापरा", असं ते म्हणाले.

Sushant Singh Rajput | सुशांतचं नेमकं कुठे चुकलं? इंडस्ट्रीतील गटबाजी, राजकारणाबाबत मनोज बाजपेयींचं मोठं वक्तव्य
सुशांतचं नेमकं कुठे चुकलं? इंडस्ट्रीतील गटबाजी, राजकारणाबाबत मनोज बाजपेयींचं मोठं वक्तव्य
Image Credit source: Instagram
Follow us on

नवी दिल्ली : अभिनेते मनोज बाजपेयी सध्या त्यांच्या आगामी ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आज (23 मे) हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत ते फिल्म इंडस्ट्रीतील घराणेशाही आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर मोकळेपणे व्यक्त झाले. इंडस्ट्रीत घराणेशाही नेहमीच असते, असं ते म्हणाले. त्याचसोबत त्यांनी इंडस्ट्रीबाहेरून येणाऱ्या कलाकारांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. “जर तुम्ही या फिल्मी जगात बाहेरून येत असाल तर नेपोटिझ्मला मनावर घेऊ नका. त्यापेक्षा तुमची ऊर्जा तुमच्या कलेत वापरा”, असं ते म्हणाले.

घराणेशाहीबद्दल काय म्हणाले?

‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत मनोज बाजपेयी घराणेशाहीबद्दल म्हणाले, “मी घराणेशाहीमुळे कधी प्रभावित झालो नाही. कारण कोणताच स्टारकिड असे चित्रपट करणार नाही, ज्यामध्ये मी काम करतो. नवाजुद्दीन करू शकेल, जर इरफान खान असता तर त्यानेही केलं असतं किंवा के. के. मेनन असे चित्रपट करू शकेल. हे व्यावसायिक चित्रपट नाहीत. त्यामुळे याकडे कोणी लक्ष देत नाही आणि त्यात पैसेही गुंतवत नाहीत. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही घराणेशाहीचं कारण देऊ शकत नाही. तुमची ऊर्जा वाया घालवू नका. रंगभूमीवर काम करा. जर तुम्ही चांगले कलाकार असाल तर रस्त्यावर परफॉर्म करूनही पैसे कमावू शकता.”

सुशांत सिंह राजपूतबद्दल काय म्हणाले?

अभिनेता सुशांतच्या निधनानंतर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला का, असं विचारलं असता ते पुढे म्हणाले, “सुशांतच्या निधनाने मला वैयक्तिकरित्या खूप मोठा धक्का बसला होता. सोनचिरैय्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही चांगले मित्र झालो होतो. तो माझ्यावर खूप प्रेम करायचा. मी सेटवर अनेकदा मटण बनवायचो आणि तो नेहमी ते खायला यायचा. तो इतकं मोठं पाऊल उचलेल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. शूटिंगदरम्यान तो माझ्याशी खूप मोकळेपणे गप्पा मारायचा. त्याच्या समस्यांविषयी आणि आव्हानांविषयी तो व्यक्त व्हायचा.”

हे सुद्धा वाचा

सुशांतचं नेमकं कुठे चुकलं?

सुशांतबद्दल मनोज बाजपेयी म्हणाले, “सुशांत कुठेतरी इंडस्ट्रीतील राजकारण आणि गटबाजीला हँडल करू शकला नाही. एखादा कलाकार जसजसा त्याच्या करिअरमध्ये पुढे जातो, तशी स्पर्धा वाढत जाते. तुमच्यासमोर विविध समस्या येतात. इंडस्ट्रीत नेहमीपासूनच राजकारण आहे. तुम्ही जसजशी यशाची पायरी चढता, ते राजकारण आणखी वाईट होत जातं. मला त्यापासून कधीच कोणती समस्या नव्हती. कारण मी जिद्दी आणि गेंड्याच्या कातडीचा होतो. मात्र सुशांत तसा नव्हता आणि तो असा पद्धतीच्या दबावाला हँडल करू शकला नव्हता. त्याने माझ्यासोबत या विषयांवर चर्चा केली होती, कारण त्या गोष्टींचा त्याच्यावर खूप परिणाम झाला होता.”

“सुशांतची आत्मा पवित्र होती”

सुशांत घराणेशाहीचा शिकार झाला का, असा प्रश्न विचारला असता मनोज यांनी नकारार्थी उत्तर दिलं. “त्याला स्वत:साठी खूपच वेगळ्या करिअरची अपेक्षा होती. जर तुम्हाला मनोज बाजपेयी व्हायचं असेल, तर इथे कोणतंच राजकारण नाही. पण त्याला स्टार बनायचं होतं आणि तिथे बरीच स्पर्धा आहे. जो कोणी स्टार बनण्याच्या मैदानात उतरतो, तो त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. सुशांत हे सगळं सहन करू शकला नाही. त्याची आत्मा खूप पवित्र होती आणि आतून तो लहान मुलगा होता. त्या राजकारणाला तो समजू शकला नाही, ज्याची फार गरज होती”, अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.