‘चंद्र आहे साक्षीला’नंतर सुबोध भावे पुन्हा सिनेमाकडे, बालगंधर्वांचे नाटक रुपेरी पडद्यावर

| Updated on: Apr 14, 2021 | 12:32 PM

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मानापमान या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. पुढील वर्षी (2022) दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार (Subodh Bhave Manaapaman Movie)

चंद्र आहे साक्षीलानंतर सुबोध भावे पुन्हा सिनेमाकडे, बालगंधर्वांचे नाटक रुपेरी पडद्यावर
सुबोध भावे मानापमान चित्रपट दिग्दर्शित करणार
Follow us on

मुंबई : ‘चंद्र आहे साक्षीला’ (Chandra Aahe Sakshila) मालिकेतील श्रीधर काळेच्या खलनायकी भूमिकेनंतर अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave)  पुन्हा मोठ्या पडद्याकडे वळत आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ (Katyar Kalajaat Ghusali) या अजरामर संगीत नाटकावर आधारित चित्रपट सुबोध भावेने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला मिळेल्या घवघवीत यशानंतर सुबोध भावे आणखी एक शिवधनुष्य पेलणार आहे. बालगंधर्वांचे ‘संगीत मानापमान’ हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर ‘मानापमान’ (Manaapman) चित्रपटाद्वारे साकारलं जाणार आहे. (Marathi Actor Subodh Bhave to direct Balgandharva Musical Play Manaapaman Movie on Big Screen)

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मानापमान या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. पुढील वर्षी (2022) दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाचं टीझर पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. सुनील फडतरे चित्रपटाची निर्मिती करत आहेत. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी संगीत मानापमान नाटक लिहिलं होतं. आता शिरीष गोपाळ देशपांडे या चित्रपटाची पटकथा लिहित आहेत.

चित्रपटाचं टीझर पोस्टर

संगीताचं शिवधनुष्य कोण पेलणार?

‘नमन नटवरा’ सारखी नांदी या नाटकाने संगीतविश्वाला दिली. नाही मी बोलत नाथा, चंद्रिका ही जणू, शुरा मी वंदिले, युवतीमना दारुण रण अशी एकापेक्षा एक पदं नाटकात होती. ही पदं आजही तितकीच लोकप्रिय आहेत. नाटकाचं संगीत गोविंदराव टेंबे यांनी केलं होतं, तर मानापमान चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय ही आघाडीची संगीतकारत्रयी करणार आहे.

कलाकारांबाबत उत्सुकता

1911 मध्ये हे नाटक रंगमंचावर आलं होतं, त्यात बालगंधर्वांची प्रमुख भूमिका होती. आता चित्रपट रुपात हे नाटक येत असताना कोण कलाकार असतील याचं कुतूहल निर्माण झालं आहे. कट्यार काळजात घुसलीद्वारे सुबोध भावने दमदार दिग्दर्शकीय पदार्पण केलं होतं, शंकर-एहसान-लॉय यांनी नाट्यपदांसह सूर निरागस हो, अरुणि किरणी अशी उत्तमोत्तम नवी गाणी कट्यारमधून दिली होती. त्यामुळे संगीत मानापमान नाटकातील कोणती पदं चित्रपटात येणार, नवी गाणी असणार का असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत.

“कट्यार काळजात घुसली” चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्याप्रमाणेच “मानापमान” या चित्रपटातूनही श्रवणीय संगीताची रसिक प्रेक्षकांना मेजवानी मिळेल, अशी आशा आहे.

संबंधित बातम्या :

‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकरांकडून कौतुक, ‘आयुष्य सार्थकी लागलं’ सुबोध भावेंची प्रतिक्रिया!

(Marathi Actor Subodh Bhave to direct Balgandharva Musical Play Manaapaman Movie on Big Screen)