
हिंदी मालिकांनंतर बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये नाव कमावलेली मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मृणाल एका साऊथ सुपरस्टारशी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा साऊथ सुपरस्टार दुसरा-तिसरा कोणी नसून रजनीकांत यांचा पूर्व जावई धनुष आहे. धनुष आणि मृणाल गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत असून त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कमालीची गुप्तता पाळल्याचं समजतंय. त्यामुळे लग्नाच्या चर्चांवर अद्याप धनुष किंवा मृणालने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. असं असलं तरी चर्चांदरम्यान मृणालने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मृणालने स्वत:चा एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये तिने जे लिहिलंय, त्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.
‘स्थिर, तेजस्वी आणि अविचल..’ असं कॅप्शन देत मृणालने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती समुद्रात काही खास क्षण घालवताना दिसत आहे. मृणालच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दरम्यान मृणाल आणि धनुषच्या लग्नाच्या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचंही एका रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय. मृणाल सध्या तिच्या आगामी चित्रपटासाठी काम करण्यात व्यस्त आहे.
मृणाल ठाकूरने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत चांगलंच नाव कमावलंय. ‘सीतारामम’, ‘नाना’, ‘जर्सी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने विशेष छाप सोडली. धुळ्याच्या मृणालने टेलिव्हिजनपासून करिअरची सुरुवात केली होती. ‘कुमकुम भाग्य’ या गाजलेल्या मालिकेत तिने काम केलं होतं. त्यानंतर तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. करिअरच्या सुरुवातीला मृणाल एका लेखकाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. शरद चंद्र त्रिपाठी असं त्या लेखकाचं नाव असून या दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं होतं. इतकंच नव्हे तर ‘नच बलिए’ या डान्स शोच्या सातव्या सिझनमध्ये दोघांनी भाग घेतला होता. या दोघांच्या लव्ह-स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मृणाल आणि शरदचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. कारण या दोघांना त्यांच्या रिलेशनशिपसाठी कुटुंबीयांची परवानगी मिळत नव्हती. अखेर शो संपल्यानंतर त्यांची जोडीसुद्धा तुटली. दोघांना वेगवेगळा मार्ग स्वीकारला.