Veer Murarbaji: रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडदयावर

| Updated on: Jun 08, 2022 | 12:12 PM

पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले.

Veer Murarbaji: रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडदयावर
‘वीर मुरारबाजी ...पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा
Image Credit source: Tv9
Follow us on

अठरापगड जाती-जमातीच्या शूर मावळ्यांना सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) जाज्वल्य इतिहास घडविला. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लढाया करणारे शूरवीर आणि पराक्रमी मावळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी सदैव तयार असत. अशा पराक्रमी आणि निष्ठावंत मावळ्यांमध्ये रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे (Murarbaji Deshpande) हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा मराठी रुपेरी पडदयावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुढच्या वर्षी 17 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट (Marathi Movie) प्रदर्शित होणार आहे. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली आहे.

‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी.. पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांची आहे. 1665 च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार असलेले मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम केला.

हे सुद्धा वाचा

पहा पोस्टर-

पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला चित्रपटाच्या माध्यमातून समजावी यासाठी ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ हा चित्रपट आम्ही घेऊन येत असल्याचे निर्माते अजय आरेकर यांनी सांगितले. अधिकाधिक तरुणांपर्यंत स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पोहोचवायचा आहे’ त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘पावनखिंड’सारखा ‘वीर मुरारबाजी… पुरंदरची युद्धगाथा’ चित्रपटही भव्यदिव्य असेल. यामध्ये मुरारबाजी यांची भूमिका कोण साकारणार, इतर कोणते कलाकार झळकणार यासंबंधित इतर घोषणा लवकरच करण्यात येणार आहेत.