मला माझ्या नावाचा इतका त्रास..; सोनाली कुलकर्णीने एकाच नावावरून मांडली व्यथा

Sonali Kulkarni on Her Same Name Actress : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी विविध मुद्द्यांवर परखड मतं मांडत असते. एका मुलाखतीदरम्यान आताही सोनालीने तिच्या नावावरून होणाऱ्या गोंधळावर खंत व्यक्त केली आहे. एकाच नावाच्या दोन अभिनेत्री असल्याने अनेकदा मनस्तापाला समोरं जावं लागतं, असं ती म्हणाली.

मला माझ्या नावाचा इतका त्रास..; सोनाली कुलकर्णीने एकाच नावावरून मांडली व्यथा
सोनाली कुलकर्णी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 27, 2024 | 3:55 PM

अनेकदा एकाच नावाची दोन माणसं असतील तर गोंधळ होतो. त्यातच या दोनही व्यक्ती एकाच क्षेत्रात काम करत असतील तर आणखीच संभ्रम निर्माण होतो. कलाक्षेत्रात असे एकाच नावाच्या दोन व्यक्ती असल्याचं पाहायला मिळतं. पण त्यामुळे समोरची व्यक्ती नक्की कुणाबद्दल बोलते आहे, याबाबत गोंधळ होतो. यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिचं मत आणि अनुभव सांगितला आहे. मराठी सिनेसृष्टीत दोन सोनाली कुलकर्णी आहेत. एक सिनियर आणि एक ज्युनिअर सोनाली कुलकर्णी…. या दोघीही एकाच क्षेत्रात काम करत असल्याने अनेकांचा संभ्रम होतो. यावर सिनियर सोनाली कुलकर्णीने एका मुलाखती दरम्यान तिचं परखड मत मांडलं आहे.

सोनाली कुलकर्णीकडून खंत व्यक्त

मला माझ्या नावाचा इतका त्रास होतो की मी काही सांगूच शकत नाही. मी इतकं काम करूनही अजूनही मला दररोज सांगावं लागतं की मी कुठली सोनाली कुलकर्णी आहे ते… मी जेव्हा नाव सांगते तेव्हा मी सांगते की हवं तर तुम्ही मला माझे सिनेमे विचारा… मला कितीतरी लोकांचे चुकीचे फोन येतात. ज्या कार्यक्रमाला मला बोलावलेलंच नसतं. त्यासाठी मला अनोळखी लोकांचे फोन येतात, असं सोनाली कुलकर्णीने म्हटलं आहे.

या सगळ्याबद्दल मी नव्या सोनाली कुलकर्णीला सांगून झालं आहे. अनेकांकडून तिला मी निरोप पाठवला आहे. पण तिचंही बरोबर आहे कारण, तिचं नावच ते आहे. पण अलिकडंच मी वाचलं की कियारा अडवाणीचं खरं नाव आलिया आहे. पण तिने सिनेसृष्टीत येण्याआधी तिचं नाव बदललं. कारण या क्षेत्रात ऑलरेडी एक आलिया आहे. त्या दोघींचं आडनावही वेगळं आहे. तरिही तिने त्या मुलीच्या अस्तित्वाची आणि स्वत: च्या अस्तित्वाची काळजी घेण्यासाठी तिने स्वत: नाव बदललं. सगळ्यांना आपल्या नावाचा स्वाभिमान असणं स्वाभाविक आहे. पण माझा त्रास मी दररोज पचवण्याचा प्रयत्न करते, असं सोनाली कुलकर्णी म्हणाली.

इतकं काम करूनही आज सांगत बसावं लागतं की मी कोणती सोनाली आहे ते आणि चुकीच्या फोनला उत्तरं देत बसावं लागतं. मला वाटतं की माझ्या नावाची काळजी घेता आली असती. थोडी तरी माझ्या नावाची काळजी घेतली असती तर मला किंचित बरं वाटलं असतं, असं सोनाली म्हणाली.